आयपीएल 2024 च्या 64व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान होतं. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. दिल्लीनं लखनऊचा 19 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकांत 4 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, लखनऊची टीम 20 षटकांत 9 गडी गमावून 189 धावाच करू शकली.
या विजयासह दिल्लीच्या टीमनं गुणतालिकेत 5व्या स्थानी झेप घेतली आहे. त्यांचे 14 सामन्यांत 7 विजय आणि 7 पराभवानंतर 14 अंक आहेत. लखनऊचे 13 सामन्यांत 6 विजयानंतर 12 अंक आहेत. ते गुणतालिकेत सातव्या स्थानी आहेत.
धावांचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात खराब झाली. कर्णधार केएल राहुल अवघ्या 5 धावा करून तंबूत परतला. इशांत शर्मानं पहिल्याच षटकात त्याची विकेट घेतली. यानंतर लखनऊच्या सातत्यानं विकेट पडत गेल्या. डीकॉक 12 आणि स्टॉयनिस 5 धावा करून बाद झाले. दीपक हुडा काही कमाल करू शकला नाही. तो भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
मधल्या षटकांमध्ये निकोलस पूरननं आक्रमक फलंदाजी करून लखनऊच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र तो बाद झाल्यानंतर संघाचा गाशा गुंडाळला गेला. पूरननं अवघ्या 27 चेंडूत 61 धावा ठोकल्या. आपल्या या खेळीत त्यानं 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. क्रुणाल पांड्यानं 18 आणि आयुष बदोनीनं 6 धावा केल्या. अखेरच्या षटकांमध्ये अर्शद खाननं जोरदार फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं, मात्र तो संघाला विजयापर्यंत पोहचवू शकला नाही. तो 33 चेंडूत 58 धावा करून नाबाद राहिला. दिल्लीकडून इशांत शर्मानं 3 बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सनं 4 गडी गमावून 208 धावा केल्या. अभिषेक पोरेलनं 21 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानं 33 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली. पोरेल आणि शाई होप यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी झाली.
पोरेलशिवाय शाई होपनं 38 धावांची आणि कर्णधार रिषभ पंतनं 33 धावांची खेळी खेळली. शेवटी ट्रिस्टन स्टब्सनं 22 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. त्यानं 25 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या. लखनऊकडून नवीन उल हकनं 2 बळी घेतले. तर अर्शद खान आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी 1 यश मिळालं.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान
इम्पॅक्ट प्लेअर्स – मणिमारन सिद्धार्थ, देवदत्त पडिक्कल, आयुष बदोनी, प्रेरक मंकड, कृष्णप्पा गौथम
दिल्ली कॅपिटल्स – अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, शाई होप, रिषभ पंत (कर्णधार/यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – इशांत शर्मा, कुमार कुशाग्र, प्रवीण दुबे, स्वस्तिक चिकारा, ललित यादव
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! सीएसकेचा हा दिग्गज प्रशिक्षक बनू शकतो राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा नवा हेड कोच
आयपीएल 2024 च्या प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, तिकीट कसं खरेदी करायचं जाणून घ्या