आयपीएल 2024 च्या 68 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करत प्लेऑफमध्ये स्थान पटकावलं. हंगामाच्या पूर्वार्धापर्यंत सर्वांना असं वाटत होतं की, आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकणार नाही. परंतु संघानं सलग 6 सामने जिंकत प्लेऑफमध्ये धडक मारली. आता 22 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे.
शनिवारी (18 मे) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यात एक ऐतिहासिक घटना घडली. या सामन्यात स्टेडियममध्ये चाहत्यांनी प्रचंड मोठा आवाज केला. आयपीएलच्या या हंगामात जेव्हा-जेव्हा महेंद्रसिंह धोनीनं मैदानावर एंट्री केली, तेव्हा-तेव्हा चाहत्यांनी खूप मोठा आवाज केला आहे. परंतु या सामन्यात परिस्थिती वेगळी होती. माहीच्या एंट्रीपेक्षाही दुसऱ्या कारणामुळे स्टेडियममध्ये एवढा मोठा आवाज होण्याची ही पहिलीच वेळ होती. हा आवाज होता आरसीबीच्या चेन्नईवरील विजयाचा! आरसीबीनं सीएसकेवर विजय मिळवून प्लेऑफमध्ये स्थान पक्क केल्यानंतर स्टेडियममध्ये 128 डेसिबलचा आवाज नोंदवला गेला. विशेष म्हणजे, या हंगामात या आधी देखील आरसीबीच्या विजयानंतर स्टेडियममध्ये प्रचंड आवाज झाला आहे.
या हंगामात जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला विजय मिळवला होता, तेव्हा मैदानात 127 डेसिबलचा आवाज नोंदवला गेला होता. दिनेश कार्तिकनं पंजाब किंग्जविरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर हा आवाज नोंदवला गेला होता.
आयपीएल 2024 च्या 13 व्या सामन्यात एमएस धोनीनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 17 व्या षटकात चौकार मारला त्यावेळी संपूर्ण मैदानात 128 डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. तर सर्वात मोठा आवाज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यातील नाणेफेकीपूर्वी झाला होता. यावेळी मैदानावर 130 डेसिबल आवाजाची नोंद झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
ठरलं! एलिमिनेटर सामन्यात आरसीबीशी भिडणार हा संघ, क्वालीफायर 1 मध्ये या दोन संघांत लढत
राजस्थान विरुद्ध कोलकाता सामन्यात पावसाचा खोळंबा, मॅच रद्द झाल्यास तिसऱ्याच संघाचा होईल फायदा