ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल 2024 च्या हंगामात आपला तिसरा विजय नोंदवला आहे. बुधवारी (17 एप्रिल) झालेल्या सामन्यात दिल्लीनं गुजरात टायटन्सचा 6 गडी राखून पराभव केला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर 90 धावांचं सोपं लक्ष्य होतं, जे त्यांनी अवघ्या 8.5 षटकात 4 गडी गमावून गाठलं. दिल्लीकडून जॅक फ्रेझर-मॅकगर्कनं 20, शाई होपनं 19 आणि ऋषभ पंतनं नाबाद 16 धावा केल्या. गुजरातकडून संदीप वारियरनं 2 बळी घेतले. राशिद खान आणि स्पेन्सर जॉन्सनला 1-1 विकेट मिळाली.
या मोसमात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाचा 7 सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. संघानं आतापर्यंत 4 सामने गमावले आहेत. या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सनं गुणतालिकेत मोठी झेप घेतली. संघ 9व्या स्थानावरून 6व्या स्थानावर आला आहे. दुसरीकडे, शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सनं आतापर्यंत 7 पैकी केवळ 3 सामने जिंकले असून 4 सामने गमावले आहेत. या पराभवानंतर गुजरातची टीम एक स्थान घसरून गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात फारच खराब झाली. संघानं 30 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. सुरुवातीच्या झटक्यानंतर त्यांना अजिबात सावरता आलं नाही. सतत पडणाऱ्या विकेट्सच्या दडपणाखाली त्याचा डाव 17.3 षटकांत 89 धावांतच गडगडला. गुजरातसाठी 8व्या क्रमांकाचा खेळाडू राशिद खाननं सर्वाधिक 31 धावा केल्या. राशिद शिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारनं 3 बळी घेतले. तर इशांत शर्मा आणि फिरकी गोलंदाज ट्रिस्टन स्टब्सनं 2-2 विकेट घेतल्या. खलील अहमद आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद
गुजरात टायटन्स – शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर