आयपीएल 2024 च्या 59व्या सामन्यात आज गुजरात टायटन्स समोर पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
गुजरात टायटन्स – मॅथ्थू वेड (यष्टिरक्षक), शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, नूर अहमद, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी
इम्पॅक्ट प्लेअर्स – संदीप वारियर, शरथ बीआर, दर्शन नळकांडे, अभिनव मनोहर, जयंत यादव
चेन्नई सुपर किंग्ज – रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टिरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मुकेश चौधरी, अरावेल्ली अवनिश
चेन्नईनं आजचा सामना जिंकला तर संघाची प्लेऑफमधील जागा भक्कम होईल. तर गुजरात टायटन्सचा पराभव झाल्यास ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील हे निश्चित आहे. चेन्नई सुपर किग्ज गुणतालिकेत 11 सामन्यांमध्ये 6 विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे सध्या 12 गुण आहेत. तर गुजरात टायटन्स गुणतालिकेत 11 सामन्यांमध्ये 4 विजयांसह तळाच्या स्थानी आहे. त्यांचे 8 गुण आहेत. चेन्नईनं शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव केला होता. त्यामुळे सध्या त्यांच्याकडे विजयाची लय आहे.
यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड चांगल्या लयीत असून त्यानं संघाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. ऋतुराजनं आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 147.01 च्या स्ट्राइक रेटनं 541 धावा केल्या आहेत. तो ‘ऑरेंज कॅप’ च्या शर्यतीत विराट कोहलीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात मोठी खेळी करुन ऑरेंज कॅप आपल्या नावावर करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. गुजरात टायटन्सविरुद्ध ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून भरपूर धावा निघाल्या आहेत. शुबमन गिलच्या संघाविरुद्ध त्यानं 6 सामन्यांमध्ये 4 अर्धशतकांसह 350 धावा केल्या आहेत.
गुजरात आणि चेन्नई यांच्या शेवटच्या सामन्यात चेन्नईनं 63 धावांनी एकतर्फी विजय मिळवला होता. या दोन संघांच्या एकूण इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 6 सामने खेळले आहेत. यापैकी चेन्नईनं 3 तर गुजरातनं 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार बदलाच्या चर्चांवर लखनऊच्या मॅनेजमेंटकडून स्पष्टीकरण, केएल राहुलकडेच असणार संघाचं नेतृत्व