आयपीएल ही जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी टी20 लीग आहे यात शंकाच नाही. आयपीएलची लोकप्रियता दरवर्षी वाढत आहे. आयपीएल 2024 मुळे बीसीसीआयच्या कमाईत देखील मोठी वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी नुकताच खुलासा केला की, आयपीएल 2024 मध्ये लीगच्या मागील हंगामातील दर्शकांची संख्या मोडली गेली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, “जिओ सिनेमा डिजिटल खेळ आणि मनोरंजनात क्रांती घडवत आहे. त्यानं अल्पावधीतच मोठं यश संपादन केलं. आयपीएल 2024 हे जिओ सिनेमासाठी उत्तम ठरलं. 62 कोटी लोकांनी स्पर्धेचा आनंद घेतला. मागील हंगामाच्या तुलनेत यात 38 टक्के वाढ झाली आहे. एकूण दर्शकसंख्या 50 टक्क्यांनी वाढली. यामुळे हा जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा लाइव्हस्ट्रीम इव्हेंट बनला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्येही हे यश कायम राहिलं.”
जिओ सिनेमाची पॅरेंट कंपनी व्हायकॉम 18 ने गेल्या वर्षी आयपीएल 2023 ते आयपीएल 2027 चे डिजिटल अधिकार 27 हजार 758 कोटी रुपयांना विकत घेतले होते. या निर्णयामुळे कंपनीला चांगला नफा मिळत आहे. त्यामुळे आयपीएलची लोकप्रियता आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकी असलेला मुंबई इंडियन्सचा संघ देखील आयपीएलमध्ये खेळतो. मात्र आयपीएल 2024 मध्ये मुंबईची कामगिरी अत्यंत खराब राहिली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघानं 14 पैकी फक्त 4 सामने जिंकले. संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता.
संघाच्या या खराब कामगिरीचं कारण चाहते रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याला मानत होते. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स आपली रणनीती तयार करण्यात व्यस्त आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये लिलाव होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा –
फिंच-गुप्टिलपासून आरपी सिंग दिलशानपर्यंत; लिजेंड्स लीगमध्ये हे दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड
रोहित शर्मा सोडणार मुंबईची साथ? आयपीएल 2025 पूर्वी चर्चांना उधाण
आयपीएल मेगा लिलावापूर्वी हेनरिक क्लासेनची स्पर्धेतून माघार; संघाला मोठा धक्का!