सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा हर्षित राणा शेवटच्या षटकात हिरो ठरला. या तरुण वेगवान गोलंदाजानं शनिवारी आयपीएल 2024 च्या तिसऱ्या सामन्यात केकेआरसाठी मॅचविनिंग गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीमुळे कोलकातानं हैदराबादवर 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला. मात्र, हर्षित त्याच्या शानदार कामगिरी ऐवजी मैदानावरील वर्तनामुळे चर्चेत आला आहे.
हर्षित राणा आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. त्यानंतर त्याला त्याच्या मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला. मयंक अग्रवाल आणि हेनरिक क्लासेनच्या विकेट्स घेतल्यानंतर राणानं या दोघांना रागानं डगआऊटचा रस्ता दाखवला होता.
मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर हर्षित राणानं त्याला फ्लाइंग किस दिला, ज्यावर महान फलंदाज सुनील गावसकर यांनी कॉमेंट्री करताना टीकाही केली होती. त्यानंतर हर्षित राणानं क्लासेनची विकेट घेतल्यानंतर अतिशय उत्साहात सेलिब्रेशन केलं, जे क्लासेनला अजिबात आवडलं नाही. क्लासेन हर्षितला काहीतरी म्हणाला आणि त्याच्या दिशेनं जाऊ लागला. मात्र केकेआरच्या कर्णधारानं मध्यस्थी करत हेनरिक क्लासेनला रोखलं.
आयपीएलनं एक निवेदन जारी करून म्हटलं की, हर्षित राणानं आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत दोन लेवल 1 चं उल्लंघन केलं आहे. यासाठी त्याला त्याच्या मॅच फीच्या अनुक्रमे 10 आणि 50 टक्के दंड ठोठावण्यात आला. या वेगवान गोलंदाजानं आपली चूक मान्य करत सामनाधिकाऱ्यांनी ठोठावलेला दंड मान्य केला असल्याचंही निवेदनात म्हटलंय. स्तर 1 आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत सामनाधिकारींचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात केकेआरला विजय मिळवून देण्यात हर्षित राणानं महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानं 4 षटकात 33 धावा देऊन 3 बळी घेतले. या वेगवान गोलंदाजानं सनरायजर्स हैदराबादला शेवटच्या षटकात 13 धावा करण्यापासून रोखलं. हर्षित राणासाठी केकेआरचा प्रवास आणखी यशस्वी होऊ शकतो. यासाठी त्याला भविष्यातही सातत्यानं अशीच कामगिरी करावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
शाहरुख खान पुन्हा वादात! आयपीएल सामन्यादरम्यान उघडपणे केलं धुम्रपान
नरेंद्र मोदी स्टेडियम नाही तर ‘या’ मैदानावर होऊ शकतो IPL 2024 चा अंतिम सामना; लवकरच घोषणा