आयपीएलच्या 17 व्या हंगामाची सुरुवात धमाकेदार झाली. स्पर्धेत आतापर्यंत 13 सामने खेळले गेले, ज्यापैकी बहुतेक सामने रोमांचक झाले आहेत. मात्र आता कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्याबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. सध्या या सामन्यावर संकटाचे काळे ढग जमा झाले आहेत.
आयपीएल 2024 च्या वेळापत्रकानुसार, 17 एप्रिल रोजी कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येतील. मात्र आता या सामन्याच्या तारखेत आणि ठिकाणात बदल होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, बीबीसीआय हा सामना दुसऱ्या ठिकाणी हलवू शकते किंवा हा सामना अन्य कोणत्या दिवशी खेळला जाऊ शकतो. या संदर्भात दोन्ही फ्रँचायझी, बंगाल क्रिकेट असोसिएशन आणि प्रसारकांना माहिती देण्यात आली आहे.
बीसीसीआय असा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे, 17 एप्रिल रोजी रामनवमी आहे. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशा स्थितीत या सामन्यात सुरक्षा पुरवणं शक्य होईल की नाही, अशी चिंता संबंधित अधिकाऱ्यांना लागली आहे. याशिवाय त्या दरम्यान देशात लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन बीसीसीआय या सामन्याच्या वेळापत्रकात बदल करू शकते.
रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, या संदर्भात बीसीसीआय आणि बंगाल क्रिकेट असोसिएशन पोलिसांच्या संपर्कात आहेत. मात्र अद्याप कुठलाही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. तरी, बीसीसीआयनं दोन्ही फ्रँचायझींना तसेच प्रसारकांना वेळापत्रकात संभाव्य बदलांच्या शक्यतेची माहिती दिली आहे.
आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नई येथे होणार आहे. क्वालिफायर सामने अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये खेळवले जातील. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामने 21 आणि 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले जातील. तर क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना चेपॉक, चेन्नई येथे 24 आणि 26 मे रोजी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
महेंद्रसिंह धोनीची ऐतिहासिक कामगिरी!…टी20 क्रिकेटमध्ये आजपर्यंत असं कोणीही करू शकलं नाही
IPL 2024 दरम्यान बीसीसीआयनं अचानक बोलावली सर्व फ्रँचायझी मालकांची बैठक, काय आहे अजेंडा?
लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, भाजपात प्रवेश करणार?