आयपीएलच्या प्रत्येक हंगामात खेळाडूंमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप मिळवण्यासाठी स्पर्धा असते. हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. आयपीएल 2024 मध्ये हा बहुमान मिळवण्यासाठी चुरशीची लढाई चालू आहे.
सध्या ऑरेंज कॅपचा ताबा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहलीकडे आहे. कोहलीनं 4 सामन्यात 203 धावा केल्या आहेत. आता या शर्यतीत सनरायझर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माही सामील झाला आहे. अभिषेक 161 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
या यादीत दुसरा क्रमांक राजस्थानच्या रियान परागचा आहे, ज्यानं 3 सामन्यात 181 धावा केल्या आहेत. त्यानंतर हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेनचा नंबर लागतो. क्लासेननं आतापर्यंत 4 सामन्यात 177 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल चौथ्या स्थानावर आहे. गिलनं 4 सामन्यात 164 धावा ठोकल्या आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. मोहितनं आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात 18.71 च्या सरासरीनं 7 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याची इकॉनॉमी 8.18 एवढी राहिली. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आहे. मुस्तफिजुरनं 3 सामन्यात 15.14 च्या सरासरीनं 7 विकेट घेतल्या आहेत. त्याची इकॉनॉमी 8.83 एवढी आहे.
या हंगामातील उदयोन्मुख खेळाडू मयंक यादवचाही पर्पल कॅपच्या शर्यतीत समावेश आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या या वेगवान गोलंदाजानं 2 सामन्यात 6.83 च्या उत्कृष्ट सरासरीनं 6 विकेट घेतल्या असून तो यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा युजवेंद्र चहल चौथ्या आणि दिल्ली कॅपिटल्सचा खलील अहमद पाचव्या स्थानावर आहे. चहलनं 9.16 च्या सरासरीनं 6 तर खलीलनं 21.83 च्या सरासरीनं 6 विकेट्स घेतल्या आहेत.
ऑरेंज कॅपची शर्यत
विराट कोहली – 203 धावा
रियान पराग – 181 धावा
हेनरिक क्लासेन – 177 धावा
शुबमन गिल – 164 धावा
अभिषेक शर्मा – 161 धावा
पर्पल कॅपची शर्यत
मोहित शर्मा – 7 बळी
मुस्तफिजूर रहमान – 7 बळी
मयंक यादव – 6 बळी
युजवेंद्र चहल – 6 बळी
खलील अहमद – 6 बळी
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादनं मिळवला 6 गडी राखून मोठा विजय
अवघ्या 12 चेंडूत केलं काम तमाम! अभिषेक शर्मानं फोडून काढली चेन्नईची गोलंदाजी