रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ऑरेंज कॅप एका खेळाडूकडून दुसऱ्याकडे फिरताना दिसली. प्रथम, पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू सॅम करननं राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनकडून ऑरेंज कॅप हिसकावून घेतली. मात्र सामन्याच्या अखेरीस ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर विराट कोहलीच्या हाती गेली. विराट कोहली आता आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
विराट कोहलीनं बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात 77 धावांची खेळी केली. अशाप्रकारे आयपीएल 2024 मध्ये त्याच्या एकूण 98 धावा झाल्या आहेत. या आधी सॅम करननं दोन सामन्यात 86 धावा केल्या होत्या. त्याचवेळी संजू सॅमसनच्या नावे एका डावात 82 धावा आहेत. मात्र, आता विराट कोहली या सगळ्यांच्या पुढे गेला आहे. या यादीत चौथ्या स्थानावर शिखर धवन आहे, ज्यानं 67 धावा केल्या आहेत, तर दिनेश कार्तिकनं 66 धावा केल्या आहेत.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
98 धावा – विराट कोहली (बंगळुरू)
86 धावा – सॅम करन (पंजाब)
82 धावा – संजू सॅमसन (राजस्थान)
67 धावा – शिखर धवन (पंजाब)
66 धावा – दिनेश कार्तिक (बंगळुरू)
पर्पल कॅपबद्दल बोलायचं झालं तर, ती आजही चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानकडे आहे. त्यानं एकाच सामन्यात चार विकेट घेतल्या होत्या. अनेक गोलंदाजांना दोन सामन्यांतही इतक्या विकेट घेता आल्या नाहीत. या यादीत दुसरं नाव जसप्रीत बुमराहचं आहे. त्यानं मुंबई इंडियन्सकडून खेळताना पहिल्या सामन्यात 3 बळी घेतले होते. याशिवाय पंजाब किंग्जचे हरप्रीत ब्रार आणि कागिसो रबाडा तसेच हैदराबादच्या नटराजननंही प्रत्येकी तीन विकेट घेतल्या आहेत.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
4 बळी – मुस्तफिजुर रहमान (चेन्नई)
3 बळी – जसप्रीत बुमराह (मुंबई)
3 बळी – हरप्रीत ब्रार (पंजाब)
3 बळी – कागिसो रबाडा (पंजाब)
3 बळी – टी नटराजन (हैदराबाद)
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2024 मध्ये आज दोन नव्या कर्णधारांची झुंज, ऋतुराज गायकवाड समोर शुबमन गिलचं आव्हान
कसोटी क्रिकेटचा थरार वाढणार! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आता चारऐवजी पाच सामने खेळले जाणार
विराट कोहलीनं रचला आणखी एक इतिहास, सुरेश रैनाचा जुना विक्रम मोडला