इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मध्ये आज (दि. 18) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना होणार आहे. यंदाच्या मोसमातील हा 33 वा सामना असणार आहे. गुणतालिकेत आठव्या स्थानावर असलेला मुंबई संघ आणि नवव्या क्रमांकावरील पंजाब सोबत भिडणार आहे. आजचा सामना रोहित शर्मासाठी खुप खास आहे. कारण आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा एक ऐतिहासिक टप्पा गाठणार आहे.
पंजाब विरुद्धचा सामना हा रोहित शर्मा साठी त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 250 वा सामना असणार आहे. यापूर्वी अशी कामगिरी चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने केली आहे. त्यानंतर आता रोहित शर्मा असा इतिहास रचणारा दुसरा खेळाडू ठरणार आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये यापूर्वी 249 मॅच खेळल्या आहेत.
रोहितने 249 सामन्यात आयपीएलमध्ये 6472 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये 42 अर्धशतके झळकवली असून दोन शतके देखील केली आहेत. रोहित शर्माची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 109 इतकी आहे. नुकतेच रोहितने वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते.
रोहित शर्मा हा मुंबईचा आणि आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा विजेतेपद पटकावले आहे. ( IPL 2024 Rohit Sharma set for big landmark as Mumbai Indians MI Vs PBKS )