आयपीएल २०२४ मधील १० पेकी ५ संघांचे ‘प्ले-ऑफ’ चे दरवाजे बंद झाले आहेत. या संघांमध्ये ५ वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI), पंजाब किंग्ज (PBKS), गुजरात टायटन्स (GT), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांचा समावेश आहे. मुंबई, पंजाब आणि गुजरात हे संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून खूप आधीच बाहेर गेले होते. तर दिल्ली आणि लखनऊ यांच्या प्ले-ऑफच्या आशा तेव्हा संपुष्टात आल्या, जेव्हा सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि गुजरात टायटन्स (GT) यांचा सामना पावसामुळे रद्द झाला.
गुणतालिकेवर नजर टाकल्यास आयपीएलच्या प्ले-ऑफ ची शर्यत सहज समजली जाऊ शकते. गुणतालिकेत सध्या शीर्षस्थानी कोलकाता नाईट रायडर्स (१९ गुण) असून दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स (१६ गुण) आणि तिसऱ्या स्थानी सनरायझर्स हैदराबाद (१५ गुण) आहे. ह्या तीन संघांनी ‘प्ले-ऑफ’ मध्ये त्यांची जागा पक्की केली आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज (१४ गुण, नेट रन-रेट +०.५२८) सध्या टाॅप-४ मध्ये आहे. परंतु चेन्नईचे प्ले-ऑफमध्ये पोहचणे अजूनही पक्के नाही. त्यांच्यासमोर १८ मे रोजी राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान आहे. आरसीबी सध्या १३ सामन्यांमध्ये १२ गुणांसह (+०.३८७ नेट रन रेट) सहाव्या स्थानावर आहे.
आयपीएलच्या हंगामात अंतिम टप्यात पावसाने खूप धिंगाना घातला असून, अनेक संघांवरती याचा प्रभाव पडला आहे. पावसानं ११ मे रोजी कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्यात एन्ट्री केली. त्यानंतर सामना १६ षटकांचा खेळला गेला. यानंतर खेळाडूंऐवजी पावसानंच या खेळाचा आनंद घेतला. गुजरातला प्लेऑफ मध्ये पोहचण्यासाठी १३ मे रोजीचा कोलकाता विरुद्धचा अखेरचा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु वरुणराजानं पुन्हा एकदा खोळंबा घातला आणि सामना रद्द करण्यात आला. ज्यामुळे गुजरातचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला.
१६ मे रोजी झालेल्या हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्यात पावसानं पुन्हा गोंधळ घालत सामना होऊच दिला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला. यामुळे दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्या प्ले-ऑफमध्ये जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या. आता १८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. पावसामुळे हा सामना झाला नाही तर, दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात येईल. अशाप्रकारे १५ गुणांसह चेन्नई या हंगामात क्वालिफाय करणारा चौथा संघ ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषक संघात निवड झालेल्या भारतीय खेळाडूला गौतम गंभीरचा सल्ला; म्हणाला, “तुझ्याकडे खूप अनुभव, पण…”
कोहली, रोहित नाही तर हे आहेत जय शाह यांचे 3 आवडते क्रिकेटपटू, जाणून घ्या