आयपीएल 2024 च्या 62व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान होतं. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. आरसीबीनं दिल्लीवर 47 धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूनं 20 षटकांत 9 गडी गमावून 187 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सची टीम 19.1 षटकांत 140 धावांवर ऑलआऊट झाली.
धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पहिल्याच षटकात 1 धाव करून बाद झाला. अभिषेक पोरेल 2 धावा करून तंबूत परतला. त्यापाठोपाठ जेक फ्रेझर मॅकगर्क (21) आणि कुमार कुशाग्रा (2) तंबूत परतले. अशाप्रकारे दिल्लीनं पॉवरप्लेमध्येच 4 विकेट गमावल्या.
यानंतर शाई होप आणि कर्णधार अक्षर पटेल यांनी थोडाफार संघर्ष केला. दोघांमध्ये 56 धावांची भागीदारी झाली. मात्र शाई होप (29) बाद झाल्यानंतर दिल्लीची फलंदाजी ढेपाळली. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्ज (3) आणि रसिख सलाम (10) आल्यापावली परतले. अक्षर पटेलच्या रुपात दिल्लीला आठवा झटका बसला आणि बंगळुरूनं सामना आपल्या मुठीत घेतला. अक्षरनं 39 चेंडूत 57 धावांची लढाऊ खेळी खेळली. बंगळुरूकडून यश दयालनं 3 आणि लॉकी फर्ग्युसननं 2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूनं 9 गडी गमावून 187 धावा केल्या. विराट कोहलीचा हा आयपीएलमधील 250 वा सामना होता, ज्यामध्ये तो 13 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. आरसीबीसाठी रजत पाटीदारनं जोरदार फटकेबाजी केली. त्यानं 29 चेंडूत अर्धशतक साजरं केलं. पाटीदार 32 चेंडूत 52 धावांची शानदार खेळी करून बाद झाला. आपल्या या खेळीत त्यानं 3 चौकार आणि 3 षटकार लगावले.
विल जॅक्सनं 29 चेंडूत 41 धावा केल्या. पाटीदार आणि जॅक्स यांच्यात 53 चेंडूत 88 धावांची भागीदारी झाली. शेवटी कॅमेरून ग्रीननं 24 चेंडूत 32 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमद आणि रसिक सलाम यांनी 2-2 बळी घेतले. तर इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स – जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल (यष्टिरक्षक), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद
इम्पॅक्ट प्लेअर्स – डेव्हिड वॉर्नर, सुमित कुमार, रिकी भुई, विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन
इम्पॅक्ट प्लेअर्स – स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, वैषाख विजयकुमार, हिमांशू शर्मा
महत्त्वाच्या बातम्या –
विराट एवढा निष्ठावंत कोणीच नाही! एकाच संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा केला विश्वविक्रम
आधी विराटनं चौकार-षटकार लगावत छेडलं, मग इशांत शर्मानं घेतला बदला; दोघांचा मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच
चेपॉकच्या संथ खेळपट्टीवर ऋतुराज गायकवाडची कमाल, चेन्नईचा राजस्थानवर शानदार विजय