आयपीएलमध्ये गुरुवारी (29 मार्च) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील रॉयल्सनं आयपीएल 2024 मधील सलग दुसरा विजय नोंदवला, तर दिल्ली कॅपिटल्सला हंगामातील सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सनं 20 षटकांत 5 बाद 185 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 173 धावाच करता आल्या.
एकेवेळी दिल्ली कॅपिटल्सची सामन्यावर पकड मजबूत दिसत होती. 7.2 षटकात राजस्थान रॉयल्सची 3 बाद 36 धावा अशी अवस्था झाली होती. मात्र यानंतर संजू सॅमसनच्या टीमनं जबरदस्त कमबॅक केलं. विशेषत: दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीला धावांवर नियंत्रण ठेवता आलं नाही.
राजस्थानकडून रियान परागनं धमाकेदार फलंदाजी केली. त्यानं 45 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं नाबाद 84 धावा ठोकल्या. अश्विननं 19 चेंडूत 29 आणि ध्रुव जुरेलनं 12 चेंडूत 20 धावांचं योगदान दिलं. परागनं डावातील अखेरच्या षटकात नॉर्कियाला 25 धावा हाणल्या. त्यामुळे राजस्थान रॉयल्सनं 20 षटकांत 185 धावांपर्यंत मजल मारली. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी राजस्थानला शेवटच्या 10 षटकांत सहज धावा दिल्या.
186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. दिल्लीचे दोन फलंदाज 3.4 षटकांत 30 धावांवर बाद झाले. यानंतर कर्णधार ऋषभ पंतनं 28 धावा केल्या, परंतु यासाठी त्यानं 26 चेंडूंचा सामना केला. डेव्हिड वॉर्नरनं 34 चेंडूत 49 आणि मिचेल मार्शनं 12 चेंडूत 23 धावा ठोकल्या, मात्र त्यांच्यापैकी एकही फलंदाज अखेरच्या षटकापर्यंत टिकून संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेरच्या षटकांमध्ये ट्रिस्टन स्टब्सने 23 चेंडूत 44 धावांची तुफानी खेळी केली, पण तो आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.
आयपीएल 2024 मधील राजस्थान रॉयल्सचा हा सलग दुसरा विजय होता. संघ 4 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स दोन सामन्यात दोन पराभवांसह गुणतालिकेट आठव्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आवेश खान ठरला हिलो, राजस्थानचा हंगामातील सलग दुसरा विजय; गुणतालिकेत सीएसकेची बरोबरी
“मुंबईत हार्दिक पांड्याविरोधात आणखी हूटिंग होईल”, माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केली भीती