इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादवर 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला. मात्र, संघाचा हा विजय मालक शाहरुख खानला महागात पडू शकतो. वास्तविक, शाहरुख खान आयपीएलच्या 17 व्या हंगामात आपल्या संघाचा सामना पाहण्यासाठी ईडन गार्डन्सवर पोहोचला होता. यावेळी तो धुम्रपान करताना कॅमेऱ्यात कैद झाला. शाहरुख खानचा धुम्रपान करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मॅच संपल्यानंतर केकेआरचा मालक शाहरुख खान यानं संघाच्या सर्व खेळाडूंची भेट घेतली. खेळाडूंशिवाय त्यानं ग्राउंड स्टाफ सदस्यांसोबतही फोटो काढले. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेला धूम्रपानाचा व्हिडिओ त्याच्या अडचणी वाढवू शकतो.
शाहरुख खानबाबत क्रिकेट स्टेडियममध्ये वाद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ग्राऊंड स्टाफशी वाद घातल्याप्रकरणी शाहरुखवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणानं बरंच लक्ष वेधलं होतं. आता ईडन गार्डन्सवरील त्याच्या धूम्रपानाच्या घटनेवर बंगाल क्रिकेट असोसिएशन काय कारवाई करेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या याबद्दल कोणतंही अपडेट नाही.
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2024 चा हा तिसरा सामना होता. या सामन्यात सनरायजर्सचा कर्णधार पॅट कमिन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र खालच्या फळीतील आंद्रे रसेलच्या (29 चेंडूत 63 धावा) शानदार फलंदाजीमुळे संघानं 208 धावांची मोठी धावसंख्या उभारली. हैदराबादकडून टी नटराजननं 32 धावा देऊन 3 विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात, हेनरिक क्लासेनच्या उत्कृष्ट अर्धशतकी खेळीनंतरही (29 चेंडूत 63 धावा) सनरायजर्सला 20 षटकांत केवळ 204 धावाच करता आल्या. संघाचा इतर कोणताही फलंदाज 50 धावांचा आकडा गाठू शकला नाही. केकेआरकडून हर्षित राणानं 33 धावा देऊन 3 विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदी स्टेडियम नाही तर ‘या’ मैदानावर होऊ शकतो IPL 2024 चा अंतिम सामना; लवकरच घोषणा
लिलावात विकल्या न गेलेल्या खेळाडूनं पदार्पणातच ठोकलं अर्धशतक! हैदराबादच्या गोलंदाजांची नाचक्की