आयपीएल 2024 च्या 57व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादसमोर लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान होतं. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादनं लखनऊ सुपर जायंट्सवर 10 गडी राखून विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना लखनऊऩं 20 षटकांत 4 गडी गमावून 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, हैदराबादनं हे लक्ष्य 9.4 षटकांत एकही विकेट न गमावता गाठलं.
सनरायझर्स हैदराबादकडून सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी कहर केला. दोघांनी कम्युटर गेमप्रमाणे चौकार-षटकारांची आतषबाजी करत लखनऊच्या गोलंदाजांची दाणदाण उडवली. ट्रॅव्हिस हेड 30 चेंडूत 89 धावा करून नाबाद राहिला. त्यानं 8 चौकार आणि 8 षटकार लगावले. त्यानं 296 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. अभिषेक शर्मानं 28 चेंडूत नाबाद 75 धावा केल्या. त्यानं 8 चौकार आणि 6 षटकार हाणले. त्यानं 267 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या संघानं एकवेळ 66 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर आयुष बदोनी आणि निकोलस पूरन यांनी संघाची धुरा सांभाळली. बदोनीनं 30 चेंडूत 55 धावांची दमदार नाबाद खेळी खेळली. तर पूरननं 26 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या.
बदोनी आणि पूरन यांच्यात 5व्या विकेटसाठी 52 चेंडूत 99 धावांची नाबाद भागीदारी झाली. यामुळे लखनऊनं निर्धारित 20 षटकांत 4 गडी गमावून 165 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं 2 आणि कर्णधार पॅट कमिन्सनं 1 बळी घेतला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन टी कॉक, केएल राहुल (कर्णधार/यष्टिरक्षक), मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, दीपक हुड्डा, क्रुणाल पांड्या, कृष्णप्पा गौथम, यश ठाकूर, रवी बिश्नोई, नवीन उल हक
इम्पॅक्ट प्लेअर्स – मनिमरन सिद्धार्थ, युधविर सिंग, देवदत्त पड्डिकल, अॅश्टन टर्नर, अमित मिश्रा
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), अब्दुल समद, शाहबाजज अहमद, सनवीर सिंह, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर
महत्त्वाच्या बातम्या –
क्रुणाल पांड्यानं ठोकला या हंगामातील 1000 वा षटकार! आयपीएलमध्ये नवा विक्रम स्थापित
संजू सॅमसनच्या वादग्रस्त झेलवर आक्रमकपणे सेलिब्रेशन करणारे पार्थ जिंदाल कोण आहेत? जाणून घ्या