आयपीएल 2024 च्या 56व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदाल राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या वादग्रस्त झेलवर आक्रमकपणे सेलिब्रेशन करताना दिसले. त्यांचा सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत आता पार्थ जिंदालबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला पार्थ जिंदाल यांच्याबद्दल इत्यंभूत माहिती देतो.
काय आहे प्रकरण?
झालं असं की, राजस्थान रॉयल्सच्या डावातील 16व्या षटकात शाई होपनं संजू सॅमसनचा सीमारेषेच्या अगदी काठावर झेल घेतला. मात्र हा झेल होता की नाही, हे तपासण्यासाठी तिसऱ्या पंचांनी उपलब्ध तंत्रज्ञानाचा पुरेसा वापर न करताच संजूला बाद घोषित केलं. या निर्णयानंतर संजू सॅमसन मैदानावर पंचांशी वाद घालताना दिसला. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल स्टँडमधून “आऊट आहे आऊट आहे” असं ओरडताना दिसले.
कोण आहेत पार्थ जिंदाल?
पार्थ जिंदाल हे इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात सक्रिय मालकांपैकी एक आहेत. ते दिल्लीच्या सामन्यांदरम्यान अनेकदा संघाला चिअर करताना दिसले आहेत. शिवाय लिलावादरम्यानही त्यांची भूमिका महत्त्वाची असते. 2018 मध्ये जेव्हा JSW ने दिल्ली फ्रँचायझीमध्ये शेअर्स घेतले तेव्हा जिंदाल यांनी संघ तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनीच दिल्ली संघाचं नाव ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ वरून बदलून ‘दिल्ली कॅपिटल्स’ असं नाव ठेवलं होतं.
पार्थ जिंदाल यांचा जन्म 19 मे 1990 रोजी झाला आहे. त्यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून शिक्षण पूर्ण केलंय. जिंदाल सुरुवातीला आर्थिक विश्लेषक म्हणून JSW समूहात सामील झाले. 2016 मध्येते JSW सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक झाले. जिंदाल यांना इंडियन सुपर लीगमधील ‘बंगळुरू एफसी’ आणि प्रो कबड्डी लीगमधील ‘हरियाणा स्टीलर्स’च्या सामन्यांदरम्यान अनेकदा सेलिब्रेशन करताना पाहिलं गेलं आहे. या दोन्ही संघांचे मालकी हक्क JSW समूहाकडे आहेत.
पार्थ जिंदाल यांचे त्यांच्या संघातील खेळाडूंशी खूप चांगले संबंध आहेत. 2022 मध्ये जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याचा कार अपघात झाला होता, तेव्हा त्यांनी पंतला खूप मदत केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सरावादरम्यान विराट कोहलीची चाहत्यांसोबत मस्ती, हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिलं?
अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणारा टी20 विश्वचषक भारतात विनामूल्य कसा पाहता येणार? जाणून घ्या
टी२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, युजवेंद्र चहलच्या नावे आणखी एक विक्रम