---Advertisement---

टी-20 इतिहासात भारताचा नवा विक्रम! किवींना झोडपलं, पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त

On: शनिवार, जानेवारी 24, 2026 7:09 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात इतिहास रचला. 209 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने केवळ 15.2 षटकांत 3 गडी गमावत हा सामना जिंकला आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (पूर्ण सदस्य राष्ट्रांमध्ये) 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य सर्वात कमी चेंडूंमध्ये गाठण्याचा नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला.

या विजयासह भारताने 28 चेंडू शिल्लक ठेवत सामना जिंकला. त्यामुळे पाकिस्तानने 2025 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच केलेला 24 चेंडू शिल्लक ठेवून विजयाचा विक्रम मोडीत निघाला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने या विजयासह 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.

या ऐतिहासिक विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला ईशान किशन. जवळपास दोन वर्षे तीन महिने संघाबाहेर राहिल्यानंतर दमदार पुनरागमन करत किशनने पॉवरप्लेमध्येच आक्रमक फलंदाजीचा नमुना सादर केला. त्याने केवळ 21 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत 32 चेंडूंमध्ये 76 धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीत 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. किशनच्या या स्फोटक सुरुवातीमुळे भारताने लक्ष्याचा पाठलाग अगदी सहज केला.

यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दीर्घकाळानंतर फॉर्ममध्ये परतलेला सूर्यकुमार 36 चेंडूंमध्ये नाबाद 82 धावा करून भारताला विजयाच्या उंबरठ्यापलीकडे घेऊन गेला. त्याला शिवम दुबेने (नाबाद 36) चांगली साथ दिली. या दोघांच्या वेगवान फलंदाजीमुळे भारताने 16व्या षटकातच सामना आपल्या नावावर केला.

भारताने मोडलेला पाकिस्तानचा विक्रम 21 मार्च 2025 रोजी ऑकलंडमध्ये नोंदवला गेला होता. त्या सामन्यात पाकिस्तानने 205 धावांचे लक्ष्य 16 षटकांत पूर्ण करत 9 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र, आता भारताने 209 धावा 28 चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण करून टी-20 इतिहासातील सर्वात वेगवान 200+ धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

हा विजय भारतासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो. केवळ विक्रमामुळेच नव्हे, तर कर्णधार सूर्यकुमार यादव 24 डावांनंतर अर्धशतकी खेळी करत पुन्हा लयीत दिसल्यामुळेही हा विजय भारतीय संघासाठी दिलासादायक ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---