आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने होते. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात हैदराबादनं राजस्थानचा 36 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकांत 9 गडी गमावून 175 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, राजस्थान रॉयल्सचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 139 धावाच करू शकला.
या विजयासह पॅट कमिन्सच्या संघानं आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विजेतेपदाच्या सामन्यात त्यांची गाठ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सशी आहे. हा सामना रविवारी (26 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल.
राजस्थानकडून ध्रुव जुरेलनं एकाकी किल्ला लढवला. तो 35 चेंडूत 56 धावा करून नाबाद राहिला. मात्र बाकीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अडखळत झाली. सलामीवीर टॉम कोहलर-कॅडमोर 10 धावा करून बाद झाला. तर यशस्वी जयस्वालनं अवघ्या 21 चेंडूत 42 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन 10 आणि रियान पराग 6 धावा करून तंबूत परतले. मधल्या षटकांमध्ये आर अश्विन 0 आणि हेटमायर 4 धाला करून बाद झाले. हैदराबादकडून शाहबाज अहमदनं 3 आणि अभिषेक शर्मानं 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं 9 गड्यांच्या मोबदल्यात 175 धावा केल्या. हैदराबादसाठी यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेननं 34 चेंडूत 4 षटकारांसह सर्वाधिक 50 धावा केल्या. याशिवाय राहुल त्रिपाठीनं 15 चेंडूत 37 धावांचं तर ट्रॅव्हिस हेडनं 28 चेंडूत 34 धावांचं योगदान दिलं. हैदराबादच्या इतर कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. आवेश खाननं 2 गडी बाद केले.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – शिमरॉन हेटमायर, नांद्रे बर्गर, शुभम दुबे, डोनोवन फरेरा, कुलदीप सेन
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – उमरान मलिक, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, शाहबाज अहमद
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2025 साठी ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते दिल्ली कॅपिटल्स, वॉर्नर-शॉ होणार रिलीज!
एलिमिनेटर सामन्यातील पराभवानंतर विराट कोहली झाला भावूक; म्हणाला, “आम्ही सन्मानासाठी खेळलो आणि…”