बीसीसीआयनं मंगळवारी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा संघाचं कर्णधारपद भूषवणार असून हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल.
भारतीय संघाच्या निवडीसाठी निवडकर्त्यांनी आयपीएल 2024 च्या कामगिरीचा मोठ्या प्रमाणावर विचार केला आहे. त्यामुळे संजू सॅमसन, शिवम दुबे यांसारखे खेळाडू त्यांच्या फॉर्मच्या जोरावर संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. बीसीसीआयनं आयपीएलच्या कोणत्या संघातील किती खेळाडूंची विश्वचषकाच्या टीममध्ये निवड केली आहे, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत.
मुंबई इंडियन्सचे 4 खेळाडू
टी20 विश्वचषकासाठी मुंबई इंडियन्सच्या 4 खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. विश्वचषकात रोहित शर्मा भारताचा कर्णधार असेल, तर हार्दिक पांड्या उपकर्णधार असेल. त्याच्याशिवाय टी20 च्या जागतिक क्रमवारीतील नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादवलाही विश्वचषक संघात स्थान मिळालं आहे. तर जसप्रीत बुमराह 1 जूनपासून सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभात भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज असेल.
राजस्थान रॉयल्सच्याही 4 खेळाडूंची निवड
राजस्थान रॉयल्सची टीम आयपीएल 2024 मध्ये दमदार कामगिरी करत आहे. संघानं आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 8 सामने जिंकले आहेत. या टीमचा कर्णधार संजू सॅमसनची याची विश्वचषकाच्या टीममध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. तर यशस्वी जयस्वालला रोहित शर्मासोबत सलामीला संधी मिळेल. त्याच्याशिवाय पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेल्या फिरकीपटू युजवेंद्र चहलचं देखील भारतीय संघात पुनरागमन झालंय. वेगवान गोलंदाज आवेश खान 15 खेळाडूंमध्ये नसला तरी त्याचा समावेश राखीव खेळाडूंमध्ये करण्यात आलाय.
दिल्ली कॅपिटल्सचे 4 खेळाडू
टी20 विश्वचषकाच्या टीममध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या 4 खेळाडूंनाही स्थान देण्यात आलेंय. कर्णधार ऋषभ पंत हा यष्टिरक्षक फलंदाज असेल. त्याच्याशिवाय अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या रूपानं दोन फिरकी गोलंदाजही आहेत. तर वेगवान गोलंदाज खलील अहमदला राखीव खेळाडूंमध्ये संधी मिळाली आहे.
आरसीबी आणि सीएसकेच्या 2-2 खेळाडूंचा समावेश
आरसीबीच्या टीममधून विराट कोहली आणि मोहम्मद सिराज या दोघांची निवड झाली आहे. कोहली आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून त्याची निवड निश्चितच होती. मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या निवडीवरून थोडे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयपीएल 2024 मध्ये सिराजचा फॉर्म फारका काही चांगला राहिलेला नाही. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे हे दोन खेळाडू भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करतील.
या 3 संघांमधून प्रत्येकी एका खेळाडूची निवड
टी20 विश्वचषकात पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. पंजाबकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला अंतिम 15 मध्ये स्थान मिळालं. तर गुजरातचा कर्णधार शुबमन गिल आणि केकेआरचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंह यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
विश्वचषकाच्या टीममध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या संघांमधून एकाही खेळाडूला संधी मिळालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतो हार्दिक पांड्या! जाणून घ्या का मिळाली टी20 विश्वचषकात संधी?