आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची लाजिरवाणी कामगिरी कायम आहे. सोमवारी (15 एप्रिल) चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं त्यांच्याविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. या सामन्यात आरसीबीचा 25 धावांनी पराभव झाला. टीमचा या हंगामातील हा सहावा पराभव आहे. आरसीबीची सततची लाजिरवाणी कामगिरी पाहून भारताचा महान टेनिसपटू महेश भूपतीही चांगलाच संतापला आहे. त्यानं आरसीबी फ्रँचायझीला चक्क विकून टाकण्याचा सल्ला दिलाय!
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 25 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर महेश भूपतीनं त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिलं, “खेळ आणि आयपीएलचे चाहते तसेच अगदी खेळाडूंच्या फायद्यासाठी मला वाटतं की बीसीसीआयनं आरसीबी संघ नवीन मालकाला विकला पाहिजे. आम्हाला नवीन मालकाची गरज आहे. असा मालक जो इतर संघांप्रमाणे एक क्रीडा फ्रँचायझी तयार करून तिची काळजी घेऊ शकेल.”
सोमवारी रात्री बंगळुरूच्या चिन्नास्वामीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस झाला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. संघानं 20 षटकांत 3 गडी गमावून 287 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीच्या फलंदाजांनीही चांगली कामगिरी करत 7 गडी गमावून 262 धावा केल्या. मात्र, संघ लक्ष्यापासून 25 धावा दूर राहिला. आरसीबीकडून दिनेश कार्तिकनं शानदार फलंदाजी करत 35 चेंडूत 83 धावांची तुफानी खेळी केली. तर कर्णधार फाफ डू प्लेसिसनं 28 चेंडूत 62 धावा केल्या.
सनरायझर्स हैदराबादकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं तुफानी फलंदाजी करत या हंगामातील सर्वात वेगवान शतक झळकावलं. हेडनं अवघ्या 39 चेंडूत शतक ठोकलं. तो 41 चेंडूत 102 धावा करून बाद झाला. याशिवाय हेनरिक क्लासेननं 31 चेंडूत 67 धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये एडन मार्करमनं 17 चेंडूत 32 धावा आणि अब्दुल समदनं 10 चेंडूत 37 धावा करत हैदराबादला 287 धावांपर्यंत पोहचवून दिलं. बंगळुरूकडून वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसननं दोन बळी घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
262 धावा करूनही 25 धावांनी हारली आरसीबी, चिन्नास्वामीवर चौकार-षटकारांचा पाऊस!
ट्रॅव्हिस हेडच्या अंगात आलं! अवघ्या 39 चेंडूत ठोकलं शतक, सगळे विक्रम मोडले