इंडियन प्रीमियर लीग मध्ये ज्या गोलंदाजाला त्याच्या केवळ एका खराब रेकाॅर्डमुळे ओळखलं जात होतं, त्या गोलंदाजानं आता आपल्या कामगिरीनं सर्वांची बोलती बंद केली आहे. गेल्या हंगामात केकेआर विरुद्ध शेवटच्या षटकात सलग 5 षटकार खाल्लेल्या यश दयालनं या हंगामात सीएसकेविरुद्ध आरसीबीला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला.
405 दिवसांपूर्वी रिंकू सिंहनं यश दयालला एका ओव्हरमध्ये सलग 5 षटकार लगावले होते. त्यामुळे दयालची कारकीर्द धोक्यात आली होती. या सामन्यानंतर यश दयालची आई राधा दयाल खूप आजारी पडली होती. परंतु आता त्याच्या सीएसकेविरुद्धच्या एका षटकानं सर्व काही बदललं आहे. चेन्नईविरुद्ध यश दयालनं महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा यांसारख्या दिग्गज फलंदाजांना अखेरच्या षटकात 17 धावा करू दिल्या नाही. त्याच्या या कामगिरीनं बंगळुरूला प्लेऑफचं तिकीट मिळालं. आपल्या मुलाच्या या कामगिरीनंतर यशची आई देखील खूप आनंदी आहे.
सामना संपल्यानंतर यश दयालनं त्याच्या आईला व्हिडिओ कॉल केला आणि विचारलं, “आता तुला कस वाटतयं?” त्या रात्री दयाल कुटुंबामध्ये उशीरपर्यंत आनंद चालू होता. यशचे वडिल चंद्रपाल दयाल म्हणाले, “यश त्याच्या आईला सांगत होता की, त्याला विश्वास होता तो एमएस धोनीला विजयी धावा बनवू देणार नाही.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “जेव्हा धोनीनं पहिल्या चेंडूवरती षटकार मारला, तेव्हा गेल्या वर्षीचं भितीदायक स्वप्न पुन्हा समोर येत होतं. परंतु माझं मन मला सांगत होतं की यावेळी काहीतरी चांगल होईल. हे सगळ यशच्या कठोर परिश्रमाचं फळ आहे. ही देवाची कृपा आहे.”
यश दयालनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 27 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 31.54 च्या सरासरीनं 28 विकेट घेतल्या आहेत. या कालावधीत यशनं 9.48 च्या इकॉनॉमीनं धावा खर्च केल्या. आयपीएल 2024 हा त्याच्यासाठी आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम राहिला, ज्यामध्ये त्यानं सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामीवर झाला रेकॉर्डब्रेक आवाज, धोनीची एंट्रीही ठरली फिकी!
ठरलं! एलिमिनेटर सामन्यात आरसीबीशी भिडणार हा संघ, क्वालीफायर 1 मध्ये या दोन संघांत लढत