आयपीएल 2025 मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होत आहे. ज्यामध्ये पहिल्या दिवसाचा लिलाव पूर्ण झाला आहे. यामध्ये स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला लखनऊ सुपर जायंट्स संघाने 27 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. तर पंजाब किंग्ज संघाने श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पण मुंबई इंडियन्स संघाने मेगा लिलावात प्रथम आरटीएमचा वापर करून स्टार खेळाडू परत मिळवण्याची संधी गमावली. हा खेळाडू दुसरा कोणी नसून आकाश मधवाल आहे.
राजस्थान रॉयल्सने आकाश मधवालला विकत घेतले.
आकाश मधवालने मागील काही काळात मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली होती आणि तो बराच किफायतशीर ठरला. त्याने आयपीएल 2023 मध्ये 14 आणि आयपीएल 2024 मध्ये पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्याने आयपीएलमध्ये एकदा पाच विकेट हाॅल घेतला आहे. मधवालची लाईन आणि लेन्थही चांगली आहे. तो महत्त्वाच्या प्रसंगी विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. मधवालसाठी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात बोली पाहायला मिळाले. मात्र मुंबई इंडियन्स संघाने लिलावात या खेळाडूवर बोली लावली नाही. विशेष म्हणजे मुंबईकडे आरटीएमचा पर्यायही नव्हता, कारण संघाने तो आधीच नमन धीरसाठी वापरला होता. अशा परिस्थितीत मुंबईकडे आरटीएम असते तर हा खेळाडू परत मिळू शकला असता.
त्यानंतर लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने आकाश मधवालला 1.2 कोटी रुपयांना संघात समाविष्ट केले. कोणत्याही कठीण परिस्थितीतून संघाला बाहेर काढण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 16 विकेट घेतल्या आहेत. लिस्ट-ए मध्ये त्याच्या नावावर 25 विकेट्स आहेत.
लिलावाच्या पहिल्या दिवशी मुंबई इंडियन्सने केवळ चार खेळाडूंना खरेदी केले. यामध्ये ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिन्झ आणि कर्ण शर्मा यांचा समावेश आहे. यापूर्वी आयपीएल रिटेनशनमध्ये मुंबईने जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवले होते. त्याच्याकडे एक आरटीएम होता. जो त्याने नमन धीरसाठी वापरला होता. आयपीएलच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझींमध्ये मुंबईची गणना केली जाते .रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.
हेही वाचा-
IPL 2025 AUCTION; पहिल्या दिवशी 72 खेळाडूंची विक्री; पंत-अय्यर सर्वात महागडे, डेव्हिड वाॅर्नर अनसोल्ड
IPL Mega Auction; 3 खेळाडू ज्यांना लिलावात मिळाली 20 कोटींपेक्षाही अधिक रक्कम!
ZIM vs PAK; झिम्बाब्वेने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्याच वनडे सामन्यावर वर्चस्व!