भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी रिटेन्शन नियम लवकरच जाहीर करणार आहे. मेगा लिलाव नोव्हेंबरमध्ये होऊ शकतो, ज्याचं आयोजन भारताबाहेर होण्याची शक्यता आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, लिलावापूर्वी आयपीएल फ्रँचायझींना 5 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळू शकते. तर ‘राईट टू मॅच’चा (RTM) पर्याय काढून टाकला जाऊ शकतो. या बदलाचा फायदा मुंबई इंडियन्स सारख्या संघांना होईल, जे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या प्रमुख खेळाडूंना रिटेन करू शकतात.
बीसीसीआयच्या मुख्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान सर्व 10 आयपीएल संघांच्या मालकांनी खेळाडूंच्या रिटेन्शन पॉलिसीवर चर्चा केली. संघातील सातत्य आणि ब्रँड व्हॅल्यू कायम राखण्यासाठी बहुतेक संघ मालकांनी 5-6 खेळाडूंना रिटेन करण्याचं समर्थन केलं. मात्र संघ दोनपेक्षा जास्त विदेशी खेळाडूंना रिटेन करू शकतो की नाही, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी नाही.
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खराब कामगिरी करणारी मुंबई इंडियन्स आपल्या स्टार खेळाडूंना रिटेन करू शकते. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स सारख्या इतर फ्रँचायझी देखील जास्त खेळाडूंना रिटेन करू शकतात.
आयपीएलचा मेगा लिलाव सहसा चार किंवा पाच वर्षांनी आयोजित केला जातो. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, कोलकाता नाईट रायडर्सचा सह-मालक शाहरुख खान यानं लिलाव पुढे ढकलण्याची मागणी केली होती. संघांना खेळाडूंमध्ये गुंतवणूक करण्यासाठी भरपूर वेळ लागतो, असं त्याचं मत आहे.
दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जच्या मॅनेजमेंटनं एमएस धोनीला ‘अनकॅप्ड खेळाडू’ म्हणून रिटेन करण्याची परवानगी मागितली असल्याची अफवा होती. मात्र, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी या वृत्तांचं खंडन केलं आहे. 2021 मध्ये रद्द करण्यात आलेला ‘अनकॅप्ड प्लेअर रूल’ पुन्हा लागू केला गेला, तर फ्रँच्याईजी धोनीला ‘अनकॅप्ड खेळाडू’ म्हणून रिटेन करू शकते.
हेही वाचा –
टीम इंडियाचा दणका! वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया क्लीन स्वीप
21व्या शतकातील भारताची सर्वोत्तम कसोटी इलेव्हन, रोहित-धोनी सारख्या अनेक दिग्गजांना मिळाली नाही जागा!
विराट कोहली विरुद्ध जो रुट वादात युवराज सिंगची उडी! सांगितलं कोणता खेळाडू सर्वोत्तम