आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा लिलावाचं ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही. मेगा लिलाव नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला होऊ शकतो.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नं अद्याप मेगा लिलावासाठी कोणतंही ठिकाण निश्चित केलेलं नाही. यामागे अनेक कारणे आहेत. परंतु आता एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये बीसीसीआयनं मेगा लिलावासाठी सिंगापूरचा विचार केला असल्याचं म्हटलं गेलंय. रिपोर्टनुसार, आयपीएलचा मेगा लिलाव सिंगापूरमध्ये आयोजित होऊ शकतो.
बीसीसीआयनं यापूर्वी मेगा लिलावासाठी लंडन आणि सौदी अरेबियाचा विचार केला होता. परंतु लंडनमध्ये प्रचंड थंडी आणि सौदी अरेबियातील हॉटेल्सच्या उच्च किंमतीमुळे बीसीसीआयला अन्य पर्यायांचा विचार करावा लागला. आता ‘क्रिकबझ’च्या एका अहवालानुसार, बीसीसीआय आयपीएल लिलावासाठी सिंगापूरचा संभाव्य ठिकाण म्हणून विचार करत आहे.
सिंगापूरशिवाय सौदी अरेबियातील एखाद्या शहराचाही विचार सुरू आहे. बीसीसीआय आणि आयपीएलचे अधिकारी अनेक पर्यायांवर विचार करत असल्याचं मानलं जातंय. संघांना याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी, फ्रँचायझींनी आशा व्यक्त केली आहे की बीसीसीआय त्यांना लवकरच सूचित करेल, जेणेकरून ते लिलावात सहभागी होणाऱ्या त्यांच्या प्रतिनिधींसाठी व्हिसा आणि प्रवासाची व्यवस्था सुरू करू शकतील.
आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेचा मेगा लिलाव आयोजित करण्यामागे अनेक लोक असतात. लिलावासाठी आयपीएलच्या 10 संघांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बीसीसीआय आणि आयपीएलचे अधिकारी उपस्थित राहतील. अशाप्रकारे प्रत्येक संघात सुमारे 10 लोक असू शकतात. याशिवाय, दोन ब्रॉडकास्टर टीम (स्टार स्पोर्ट्स आणि जिओसिनेमा) देखील असतील. अशा परिस्थितीत, खर्च हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो बीसीसीआयसाठी नसला तरी फ्रँचायझी आणि ब्रॉडकास्टिंग टीमसाठी महत्त्वाचा आहे. यामुळेच सौदी अरेबियातील मोठ्या हॉटेल्सचा सध्या विचार केला जात नाही.
हेही वाचा –
या रणजी खेळाडूंना लवकरच मिळू शकते टीम इंडियामध्ये जागा, एकाचं स्थान जवळपास पक्कं!
माजी कर्णधारासह दिग्गज गोलंदाजाला रिलिज करण्याच्या मूडमध्ये सनरायझर्स हैदराबाद! या खेळाडूंना करणार रिटेन
“ही माझी शेवटची संधी…”, झंझावती शतकानंतर संजू सॅमसन काय म्हणाला?