आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं शनिवारी (28 सप्टेंबर) आयपीएल 2025 साठी रिटेन्शन नियम जाहीर केले. आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर एकूण 8 नियम नमूद करण्यात आले आहेत, त्यापैकी एक नियम अतिशय मनोरंजक आहे. हा नियम असा आहे, ज्यामुळे भले-भले खेळाडू ठिकाणावर येतील. काय आहे हा नियम? हे या बातमीद्वारे जाणून घेऊया.
आयपीएलच्या एकूण 8 नियमांपैकी 6वा नियम हा स्पर्धेतून माघार घेणाऱ्या खेळाडूंसंबधी आहे. या नियमानुसार, लिलावात निवड झाल्यानंतर स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माघार घेणाऱ्या खेळाडूवर 2 वर्षांची बंदी लावण्यात येईल. आयपीएल 2024 मध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड यानं लिलावात विकल्या गेल्यानंतर आपलं नाव मागे घेतलं होतं. वुडला लखनऊ सुपरजायंट्सनं 7.50 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. परंतु त्यानं वर्कलोड मॅनेजमेंटचा हवाला देत आपलं नाव मागे घेतलं. आता अशा खेळाडूंवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय, मेगा ऑक्शनसाठी विदेशी खेळाडूंना नोंदणी करणं बंधनकारक असल्याचा नियम आयपीएलनं मंजूर केला आहे. या नियमानुसार, जर विदेशी खेळाडूनं मेगा लिलावासाठी स्वत:ची नोंदणी केली नाही, तर तो पुढील वर्षी होणाऱ्या मिनी लिलावासाठी नोंदणी करू शकणार नाही.
2022 च्या आयपीएलपूर्वी झालेल्या मेगा लिलावात संघांना फक्त चार खेळाडूंना रिटेन करण्याचा पर्याय होता. आता 2025 च्या मेगा लिलावापूर्वी, संघ एकूण 6 खेळाडूंना रिटेन करू शकतील. यामध्ये जास्तीत जास्त 5 कॅप्ड आणि 2 अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश असेल. याशिवाय राईट टू मॅच (RTM) चा पर्याय देखील खुला असेल. याशिवाय सर्व संघांना जास्तीत जास्त 2 अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा –
‘थाला’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनीचा आयपीएल 2025 मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा; खास नियम लागू
IPL 2025 Retention Rules; रिटेंशन नियमात मोठे बदल, RTM कार्डचाही वापर होणार
ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार कर्णधारपदी कायम