आज (१६ मे) आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना रंगणार आहे. हा सामना ईडन गार्डन्सवर खेळला जाणार असून यामध्ये केकेआरचा स्टार फिरकीपटू सुनील नरेन मैदानात पाऊल ठेवताच इतिहास रचणार आहे. तो केकेआरचा उत्कृष्ठ खेळाडू असून मागील अनेक हंगामापासून संघासोबत आहे.
आयपीएल २०१२ मध्ये पदार्पण करणारा नरेन आज (१६ मे) आपला २०० वा आयपीएल सामना खेळणार आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा पहिलाच विदेशी खेळाडू ठरेल. आतापर्यंत १२ भारतीयांनी हा पराक्रम केला आहे.
नरेन २०१२ मध्ये पदार्पण केल्यापासून गेल्या १५ वर्षांपासून त्याच संघासोबत आहे. त्याने १९९ आयपीएल सामन्यांमध्ये ६.७९ च्या इकॉनॉमी रेटने २०३ विकेट्स घेतल्या आहेत. एवढी मोठी कारकिर्द असूनही त्याचा इकॉनॉमी रेट पाहता त्याच्या गोलंदाजाची गुणवत्ता दर्शवते.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा यांच्या नावावर आहे. दोघांनी आतापर्यंत २७९ सामने खेळले आहेत. या हंगामात विराट-रोहितने या यादीत एमएस धोनीला मागे टाकले आहे. यापूर्वी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता, त्याने २७८ सामने खेळले असून या हंगामात त्याने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे-
२७९* – विराट कोहली
२७९* – रोहित शर्मा
२७८* – एमएस धोनी
२६५*– रविंद्र जडेजा
२५७ – दिनेश कार्तिक
२२२ – शिखर धवन
२२१ – आर अश्विन
२०९ * – अजिंक्य रहाणे
२०५ – सुरेश रैना
२०५ – रॉबिन उथप्पा
२०४ – अंबाती रायुडू
२०२* – भुवनेश्वर कुमार
१९९* – सुनील नरेन






