तीन वेळेचा आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स २०२६ च्या हंगामाआधी काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे अडचणींचा सामना करत आहे. त्यामधून मार्ग कसा काढायचा या विचारात असताना २१ वर्षीय फलंदाजाने संघाच्या तयारीला आणि अपेक्षांना बळ दिले आहे. त्याने स्फोटक फलंदाजी करताना शतकी खेळी केली आणि तो आयपीएलसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सिद्ध केल आहे. तो आहे अंगक्रिश रघुवंशी.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना रघुवंशीने ५५ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०३ धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १८७.२७ राहिला. त्याच्या या खेळीमुळे पर्पल नाईट संघाने १९.२ षटकात २०० धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठले.
कोलकाताने शुक्रवारी (२० मार्च) घरच्या मैदानावर ईडन गार्डन्सवर आपला पहिला सराव सामना खेळला. यामुळे कोलकाताच्या संपूर्ण संघाची गोल्ड नाईट्स आणि पर्पल नाईट्समध्ये विभागणी करण्यात आली. गोल्डने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या. त्यामध्ये रिंकू सिंगने ४० धावा, टिम सेफर्टने ४६ आणि सार्थक रंजन यानेही ३७ धावा केल्या. पर्पलकडून सर्वाधिक विकेट्स (३) कार्तिक त्यागीने घेतल्या.
फिन ऍलनने लक्ष्याचा पाठलाग करताना पर्पलला चांगली सुरूवात करुन दिली. कोलकाताचा कर्णधार अजिंक्य राहाणे लवकरच बाद झाला. त्यानंतर रघुवंशीने संघाचा डाव सांभाळला. भारताच्या १९ वर्षाखालील विश्वचषक संघाचा सदस्या असलेल्या रघुवंशीने संयमी खेळी केली. नंतर त्याने मोठे शॉट्स खेळत २९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
रघुवंशीने २० व्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारला आणि शतक पूर्ण केले. त्याच्या ५५ चेंडूत नाबाद १०३ धावांच्या खेळीमुळे पर्पलने हा सामना सहा विकेट्सने जिंकला.
“सध्या कशाचाच अंदाज लावता येणार नाही. मी तुम्हाला एवढचं सांगू शकतो की स्पर्धा कशी पार पडेल हे माहित नाही, मात्र २९ मार्चपर्यंत एक मजबूत प्लेइंग इलेव्हन आमच्याकडे असेल याची खात्री आहे”, असे केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी माध्यमांना सांगितले. केकेआरचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.
आयपीएल २०२६ मध्ये केकेआरचा पहिला सामना २९ मार्चला मुंबई इंडियन्स विरुद्ध आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.






