आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात आज गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात जेतेपदासाठी लढत रंगणार आहे. या सामन्यापूर्वी चाहत्यांमध्ये आयपीएलच्या बक्षीस रकमेबाबत मोठी उत्सुकता आहे. यंदा बक्षीस रकमेत कोणताही बदल झाला आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सध्या तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आयपीएल 2026 च्या बक्षीस रकमेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील काही हंगामांप्रमाणेच यंदाही विजेत्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. उपविजेत्या संघाला सुमारे 12.5 ते 13 कोटी रुपये दिले जातात.
विशेष म्हणजे, 2016 नंतर आयपीएलच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल झालेला नाही. मात्र सुरुवातीच्या काळात ही रक्कम खूपच कमी होती. 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली तेव्हा विजेत्या संघाला केवळ 4.8 कोटी रुपये, तर उपविजेत्याला 2.4 कोटी रुपये मिळत होते.
यानंतर 2010 मध्ये प्रथमच मोठी वाढ करण्यात आली. विजेत्या संघाची बक्षीस रक्कम थेट 10 कोटी रुपयांवर पोहोचली, तर उपविजेत्याला 5 कोटी रुपये देण्यात आले. 2014 मध्ये आयपीएलची लोकप्रियता वाढल्यानंतर विजेत्या संघासाठी 15 कोटी आणि उपविजेत्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
2016 मध्ये शेवटचा बदल करण्यात आला. तेव्हापासून विजेत्या संघाला 20 कोटी रुपये आणि उपविजेत्याला 12.5 ते 13 कोटी रुपये मिळत आहेत.
फक्त अंतिम फेरी गाठणाऱ्या संघांनाच नव्हे, तर प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या इतर संघांनाही बक्षीस दिले जाते. तिसऱ्या क्रमांकावरील संघाला 7 कोटी रुपये, तर चौथ्या स्थानावरील संघाला 6.5 कोटी रुपये मिळतात.
याशिवाय वैयक्तिक पुरस्कारांसाठीही आकर्षक बक्षिसे आहेत. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर (एमव्हीपी) ला 15 लाख रुपये, इमर्जिंग प्लेअर ला 20 लाख रुपये, तर सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन आणि फेअरप्ले पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.
आता आयपीएल 2026 चे विजेतेपद आणि कोट्यवधींची बक्षीस रक्कम कोणाच्या नावावर होते, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.






