टी २० विश्वचषकानंतर इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) २०२६च्या हंगामाला सुरूवात होणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राजस्थान रॉयल्स (आरआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांना त्यांचे घरच्या मैदानाचे ठिकाण निश्चित करायला सांगितले आहे. त्यासाठी बीसीसीआयने दोन्ही संघाना २७ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे.
बीसीसीआयने आरआरला जयपूर आणि आरसीबीला बेंगलोरमध्ये सामने आयोजित करायचे की नाही हे विचारले आहे. तसे नसेल तर तुमचे होमग्राऊंड कोणते त्यावर लवकर निर्णय घ्या, असेही सांगितले आहे. राजस्थान क्रिकेटची निवडणूक न झाल्याने जयपूरबाबत संशय आहे. तर बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मागील वर्षी झालेल्या प्रकारामुळे त्यांना घरच्या मैदानावर सामने आयोजित करण्यासाठी कर्नाटक सरकारचे नियम मानावे लागणार आहे.
आरआर त्यांचे घरचे सामने पुण्यात खेळू शकतो, तर आरसीबी घरचे मैदान म्हणून मुंबईच्या डीवाय पाटीलमध्ये पाच आणि रायपूरमध्ये दोन सामने खेळू शकतात. तसेच मुंबईमध्ये सामने खेळण्यासाठी त्यांना मुंबई इंडियन्सची मंजुरी घ्यावी लागेल. आयपीएलच्या नियमानुसार दोन संघ एकाच शहरात सामने आयोजित करू शकत नाही. तसेच आयपीएलचे वेळापत्रक तमिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगाल यांच्या निवडणूकीच्या तारखांनंतर कळेल. यासाठी दोन्ही संघांनी त्यांचा निर्णय शक्य होईल तितका लवकर सांगावा.
मागील वर्षीचा (२०२५) हंगाम आरसीबीने जिंकला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाचा विजेतेपद जिंकल्याने त्यांनी त्यांचे घरचे मैदान चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सेलेब्रेशन ठेवले होते. ज्यामध्ये अधिक गर्दी झाल्याने ११ चाहत्यांना त्यांचा जीव गमवावा लागला होता. यानंतर कर्नाटक सरकारने एक नियम लागू केला. तो असा की स्टेडियममध्ये किंवा बाहेर काहीही झाल्यास त्याची जबाबदारी तो कार्यक्रम आयोजित केलेल्या संघाची असते. या नवीन नियमाच्या भीतीने आरसीबी घरचे मैदान म्हणून बेंगलोरमध्ये खेळणार की दुसरीकडे याबाबत शंका आहे.
आयपीएल २०२६चा हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार असून अंतिम सामना ३१ मे ला खेळला जाणार आहे.
आरआर आणि आरसीबी यांनी त्यांचे होमग्राऊंड निश्चित केले तर आयपीएल २०२६चे सामने चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मुंबई (वानखेडे, डीवाय पाटील), पुणे, रायपूर, लखनऊ, अहमदाबाद, चंडीगड, हैद्राबाद, धरमशाला, विशाखापट्टणम, गुवाहाटी, जयपूर, बेंगलोर, रांची, आणि तिरूअनंतपुरम येथे होऊ शकतात.






