आयपीएल 2026 च्या 13व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने गुवाहाटीमध्ये आपल्या विस्फोटक फलंदाजीने खळबळ उडवून दिली. गुवाहाटीमधील पावसामुळे टॉसला उशीर झाला. परिणामी सामना प्रत्येक संघासाठी 11 षटकांचा करण्यात आला. सामन्यातील षटके कमी झाल्यामुळे, यशस्वी जयस्वालने अगदी पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची निर्दयपणे धुलाई केली. केवळ जयस्वालच नव्हे, तर वैभव सूर्यवंशीनेही आपल्या स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. या जोडीने मिळून मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी अवघ्या 5 षटकांतच तब्बल 80 धावांची भर घातली.
वैभवने अत्यंत आक्रमक फलंदाजी केली. त्याने 14 चेंडूंत 39 धावा कुटल्या, त्यानंतर 5व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद होऊन तंबूत परतला. वैभव बाद झाल्यानंतरही, जयस्वालने आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडणे सुरूच ठेवले. त्याने अवघ्या 23 चेंडूंतच आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी, मुंबईचे गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसून आले. त्याने केवळ 32 चेंडूंत नाबाद 77 धावांची धडाकेबाज खेळी साकारली, ज्यामध्ये 10 चौकार आणि 4 षटकांचा समावेश होता.
या शानदार खेळीदरम्यान, यशस्वी जयस्वालने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. आपला चौथा षटकार ठोकून, जयस्वालने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 100 षटकारांचा आकडा पूर्ण केला. यापूर्वी, राजस्थानसाठी 100 षटकार ठोकण्याचा हा पराक्रम केवळ संजू सॅमसन, जोस बटलर आणि शेन वॉटसन या खेळाडूंनीच केला होता. इतक्या कमी वयात अशी आक्रमकता आणि सातत्य दाखवून, जयस्वालने हे सिद्ध केले आहे की, येत्या काळात तो भारतीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवणार आहे.
राजस्थानसाठी 100हून अधिक षटकार ठोकणारे फलंदाज:
संजू सॅमसन (192)
जोस बटलर (135)
शेन वॉटसन (109)
यशस्वी जयस्वाल (100)*
यशस्वी जयस्वालने डावाच्या अगदी सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले होते. पहिल्याच षटकात दीपक चहरविरुद्ध 22 धावा कुटून त्याने सामन्याची दिशा निश्चित केली. त्यानंतर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसारखे दिग्गज गोलंदाजही त्याच्या आक्रमक फलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. अल्लाह गझनफरने दोन बळी घेत मुंबई इंडियन्ससाठी सामन्यात काही प्रमाणात पुनरागमन घडवून आणले असले, तरी जयस्वाल मात्र अगदी शेवटपर्यंत क्रीजवर ठामपणे उभा राहिला आणि त्याने आपल्या संघाला 150/3 या भक्कम धावसंख्येपर्यंत पोहोचवले.






