---Advertisement---

आरसीबी-राजस्थान रॉयल्सच्या घरच्या सामन्यांवर संकट, बीसीसीआयने दिली डेडलाइन

On: बुधवार, जानेवारी 21, 2026 3:30 PM
---Advertisement---

आयपीएल 2026 संदर्भातील चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे. बीसीसीआयने राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) या दोन संघांना मंगळवार, 20 जानेवारी रोजी महत्त्वाची डेडलाइन दिली आहे. या दोन्ही संघांना 27 जानेवारीपर्यंत आपले होम मॅच जयपूर आणि बेंगळुरू येथे आयोजित करायचे आहेत की नाही, याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी लागणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीच्या होम ग्राउंडवर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमला यंदा आयपीएल सामन्यांचे यजमानपद मिळण्याची शक्यता कमी आहे. राजस्थान क्रिकेट संघटनेच्या निवडणुका अद्याप न झाल्यामुळे निर्माण झालेला प्रशासकीय पेच यामागचे मुख्य कारण आहे. त्यामुळे बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सकडे पर्यायी स्थळाचा विचार करण्यास सांगितले आहे.

दुसरीकडे, बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आयपीएल 2025 च्या विजयी सेलिब्रेशननंतर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर (ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता) कर्नाटक सरकारने एक कठोर कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार, स्टेडियममध्ये होणाऱ्या सामन्यांदरम्यान किंवा कार्यक्रमाच्या आसपासच्या बाहेरील रस्त्यांवर घडणाऱ्या कोणत्याही घटनेसाठी आयोजकांना जबाबदार धरले जाणार आहे. या अटीमुळे आरसीबीचे मालक अस्वस्थ असून, त्यामुळेच बेंगळुरूमध्ये सामने आयोजित करण्याबाबत संघ सावध भूमिका घेत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थान रॉयल्स आपले होम सामने पुण्यात खेळण्याची शक्यता आहे. तर आरसीबी डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे पाच आणि रायपूरमध्ये दोन होम सामने आयोजित करू शकते. मात्र, नवी मुंबईत सामने घ्यायचे असल्यास आरसीबीला मुंबई इंडियन्सकडून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ (NOC) घ्यावे लागेल, कारण आयपीएलच्या नियमानुसार एका शहरात दोन संघांचे होम सामने आयोजित करता येत नाहीत.

दरम्यान, आयपीएल 2026 चे अधिकृत वेळापत्रक तमिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच जाहीर होणार आहे. आयपीएल 2026 ची सुरुवात 26 मार्चपासून होणार असून अंतिम सामना 31 मे रोजी खेळवला जाणार आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई, दिल्ली, लखनऊ, मुंबई (वानखेडे), कोलकाता, अहमदाबाद, न्यू चंदीगड, हैदराबाद, धर्मशाळा, विशाखापट्टनम, गुवाहाटी, जयपूर, बेंगळुरू, पुणे, रायपूर, रांची, नवी मुंबई (डी. वाय. पाटील) आणि तिरुअनंतपुरम या शहरांमध्ये आयपीएल सामने होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---