आयपीएल २०२६ प्लेऑफच्या शर्यतीसाठी जिंकणे अशा अत्यावश्यक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा विकेटकीपर-फलंदाज अंगकृष रघुवंशी बुधवारी (२० मे) मुंबई इंडियन्सविरुद्ध फलंदाजीला आला नाही. केकेआरचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने रघुवंशी फलंदाजीला का आला नाही, या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्याचबरोबर तो आता आयसीसीच्या नियमामुळे पुढील सामन्याला मुकण्याची शक्यता आहे
ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सचा ४ विकेट्सने पराभव केला, मात्र या हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा रघुवंशी ६ विकेट्स पडूनसुद्धा फलंदाजीला आला नाही, याचे सर्वाना आश्चर्य वाटले. सामन्यानंतर वॉटसनने सांगितले की, मानेच्या दुखापतीमुळे तो फलंदाजीसाठी आला नाही.
या सामन्यात केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला आणि एमआयला कमी धावसंख्येवर रोखले. जेव्हा एमआयची फलंदाजी सुरू होती तेव्हा ११ व्या षटकात तिलक वर्माचा झेल घेण्याच्या प्रयत्नात रघुवंशी वरुण चक्रवर्तीला धडकला, ज्यामुळे तिलकला जीवनदान मिळाले. वरुणने चेंडू पकडला होता, मात्र रघुवंशी त्याला धडकला आणि चेंडू त्याच्या हातातून निसटला. त्याचवेळी रघुवंशीला मानेची दुखापत झाल्याचे कळते.
रघुवंशीच्या या दुखापतीबद्दल वॉटसनने सामन्यानंतर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, “अंगकृष तो झेल घेण्यासाठी खूप अंतर पळाला, मात्र दुर्दैवाने त्याची वरुण चक्रवर्तीसोबत जोरदार धडक झाली. या धडकेमुळे त्याला मानदुखी, चक्कर आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. फलंदाजीच्या दृष्टीकोनातून आम्हाला त्याची उणीव भासली, तो सामना खेळण्यास आतुर होता, मात्र तसे झाले नाही.”
रघुवंशीने आतापर्यंत खेळलेल्या १२ डावांमध्ये १४६.५२ च्या स्ट्राईक रेटने ४२२ धावा केल्या आहेत. त्याला आयसीसीच्या कडक ‘कन्कशन प्रोटोकॉल’मुळे फ्रॅंचायजी २४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या निर्णायक प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकणार नाही.
आयसीसीच्या ‘कन्कशन रिप्लेसमेंट’ नियमानुसार, ज्या खेळाडूमध्ये कन्कशनची लक्षणे दिसतात त्याला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याआधी सात दिवसांच्या अनिर्वाय विश्रांतीच्या कालावधीतून जावे लागते. खेळाडूंच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या या नियमामुळे रघुवंशी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता आहे. जर तो या सामन्याला मुकला तर संघाला अडचण येण्याची शक्यता आहे. केकेआरला प्लेऑफसाठी पात्र होण्यास हा सामना जिंकणे आवश्यक आहे.






