---Advertisement---

IPL 2026: वेगवान गोलंदाज मोठ्या संख्येने दुखापतग्रस्त का होत आहेत? आरसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले कारण

On: बुधवार, मार्च 25, 2026 10:26 AM
Josh Hazlewood
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामाआधी अनेक संघांना मोठे धक्के बसले आहेत. त्यांचे अनेक वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत, तर काही उशिरा संघाशी जोडले जाणार आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराह याचाही समावेश आहे. तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बेंगलोरमधील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये दाखल झाला आहे. त्याची दुखापत गंभीर नाही, यामुळे तो लवकरच मुंबईच्या संघात दाखल होणार आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात वेगवान गोलंदाज का दुखापतग्रस्त होत आहेत? मागचे कारण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

आरसीबीचा संघ आयपीएल २०२६ चे सुरूवातीचे काही सामने वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याच्याशिवाय खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या वेगवान गोलंदाजांप्रमाणे मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सही सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जमधून नॅथन एलिस बाहेर झाला आहे. आरसीबीचे क्रिकेट संचालक मो बोबाट यांच्यामते, व्यस्त क्रिकेट वेळापत्रकाचा हा परिणाम आहे. वाढत्या क्रिकेटमुळे खेळाडूंवर त्याच्या ताण येत आहे.

“माझ्या मते, हे क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाचे लक्षण आहे. आपल्यापैकी जे क्रिकेट पाहतात, त्यांना माहीत आहे की ते किती कठीण आहे. देशांतर्गत स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशी स्थिती असून हे काही चांगले नाही. शेवटच्या क्षणी खेळाडूंची अनुपलब्धता हे संघासाठी योग्य नाही, कारण त्यामुळे त्यांच्या नियोजनावर त्याचा परिणाम होतो. आम्ही केवळ परिस्थिती कशी नियंत्रणात आणली जाऊ शकते, याचा प्रयत्न करतो. जे संघ अशा स्थितीला सामोरे जात आहे त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे,” असे बोबाट यांनी मंगळवारी (२४ मार्च) पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

“आम्ही आंतरराष्ट्रीय बोर्डाशी जवळून संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आमची वैद्यकीय टीम उत्तम आहे. ते नेहमी खेळाडू आणि दुसऱ्या संस्थांच्या वैद्यकीय टीमच्या संपर्कात असतात. हेझलवूड हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. मागील वर्षी आमचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी चांगले संबंध राहिले होते, त्यामुळेच तो संघात परतणार आहे. त्यामुळे आपल्याला जशी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळता आली पाहिजे, असे माझे मत आहे,” असेही बोबाट यांनी पुढे सांगितले आहे.

आयपीएलच्या मागील हंगामात हेझलवूडने आरसीबीच्या पहिल्या विजेतेपदामध्ये महत्वाची भुमिका पार पाडली होती. आता २०२६ च्या हंगामात गतविजेत्याचा पहिला सामना २८ मार्चला सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---