इंडियन प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळतो. ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत क्रिकेट स्पर्धा आहे. यात युवा खेळाडूंसह अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश असतो.
आयपीएलमध्ये ख्रिस गेल हा खेळाडू तर चौकार-षटकारांसाठी ओळखला जातो. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही याच खेळाडूच्या नावावर आहे. त्याच्या व्यतिरिक्त कायरण पोलार्ड, हार्दिक पंड्या, आंद्रे रसेल आणि रिषभ पंत असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत जे कधीही चेंडूला मैदान बाहेर पाठवू शकतात.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये खेळताना अनेक खेळाडूंनी लांबलचक षटकार मारले आहेत. या लेखात तुम्हाला आयपीएलच्या इतिहासातील ५ सर्वात लांब षटकारांबद्दल सांगणार आहोत.
आयपीएलच्या इतिहासातील हे ५ सर्वात लांब षटकार-
५. रॉस टेलर
आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरचाही समावेश आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीच्या हंगामात रॉस टेलरने ११९ मीटर लांब षटकार मारून सर्वांना चकित केले होते. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध जेकब ओरामला हा षटकार ठोकला होता. त्याच्या खेळीदरम्यान टेलरने ३४ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या होत्या. त्याने आयपीएलमध्ये एकूण ४६ षटकार ठोकले आहेत आहेत. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब षटकार मारण्याच्या बाबतीत त्याचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे.
४. रॉबिन उथप्पा
रॉबिन उथप्पा सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. परंतु यापूर्वी तो कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचादेखील भाग होता. आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. लांब षटकार मारण्याच्या बाबतीत रॉबिन उथप्पा हा चौथ्या क्रमांकावर आहे. रॉबिन उथप्पाने आयपीएलमध्ये सर्वाधिक लांब षटकार २०१० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर मारला आहे. त्याने १२० मीटर लांबीचा षटकार ठोकला आहे. या सामन्यात त्याचा संघही जिंकला होता.
३. अॅडम गिलक्रिस्ट
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर आयपीएलच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम आहे. गिलक्रिस्टने २०११ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत हा पराक्रम केला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध त्याने चार्ल लेंगेव्हल्ड्टच्या गोलंदाजीवर १२२ मीटर लांबीचा षटकार ठोकला होता. त्याने सामन्यात ५५ चेंडूत १०६ धावांची शानदार खेळीही केली. यामुळे पंजाबने २० षटकांत बेंगलोरसमोर २३३ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
२. प्रवीण कुमार
आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांब षटकार ठोकण्याचा विक्रम एका भारतीय गोलंदाजच्या नावावर आहे. भारतीय वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने आयपीएलमध्ये १२४ मीटर लांबीचा षटकार ठोकला असून त्याने या एका षटकाराने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आयपीएलच्या सुरुवातीच्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत असलेल्या प्रवीण कुमारने राजस्थान रॉयल्सविरुद्ध युसुफ पठाणच्या गोलंदाजीवर १२४ मीटर लांबीचा षटकार मारला होता.
१. अॅल्बी मॉर्केल
आयपीएलमध्ये अद्याप अॅल्बी मॉर्केलच्या सर्वाधिक लांब षटकाराचा विक्रम कोणत्याही फलंदाजाने मोडला नाही. अॅल्बी मॉर्केलने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असताना आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वाधिक लांब षटकार ठोकला आहे. या खेळाडूने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात चेन्नईचे घरचे मैदान चेपॉक स्टेडियमवर डेक्कन चार्जर्सविरूद्ध प्रज्ञान ओझाच्या गोलंदाजीवर १२५ मीटर लांबीचा षटकार ठोकला होता.