जगातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. ही स्पर्धा विशेषतः युवा खेळाडुंसाठी उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धेतून अनेक खेळाडूंच्या निवडीची दारे उघडली आहेत. या स्पर्धेतून अनेक खेळाडूंना आपल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. यात हार्दिक-क्रुणाल हे पंड्या बंधू, जसप्रीत बुमराह अंबाती रायुडू, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आशा अनेक खेळाडूंची नावे आपण घेऊ शकतो.
पण आयपीएलमध्ये असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी आपला संघ जिंकण्यात आणि आयपीएलमध्ये संघाला चॅम्पियन बनविण्यात मोठी भूमिका बजावली आहे, परंतु त्यांना कामगिरीनुसार ओळख मिळू शकली नाही किंवा कदाचित त्यांच्या कामगिरीला तितकेसे महत्त्व दिले गेले नाही. या लेखात अशाच आयपीएलच्या पाच खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी संघाला चॅम्पियन बनविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
ते ५ दिग्गज खेळाडू कोण आहेत हे जाणून घ्या: –
५. पीयूष चावला –
पीयूष चावलाने त्याचा आधीचा आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्ससाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१४ मध्ये तो आयपीएल विजेत्या केकेआर संघाचा सदस्य होता. या भारतीय फिरकी गोलंदाजाकडे आयपीएल २०२० च्या आधी १५७ सामन्यात १५० बळी मिळवण्याचा विक्रम केला होता. यावेळी त्याने अवघ्या ७.८२ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आणि फलंदाजीतुन काही महत्त्वपूर्ण खेळीही साकारल्या होत्या. परंतु प्रयत्न करूनही त्याला मोठी ओळख मिळाली नाही. कॅरेबियन फिरकीपटू सुनील नरेन नेहमीच केकेआरची पहिली पसंती राहिला.
चावला आता यंदा चेन्नई सुपर किंग्स संघात दाखल झाला असून यंदाच्या हंगामात त्याने आतापर्यंत ५ सामन्यात ६ बळी मिळवले आहेत.
४. शिखर धवन –
शिखर धवनलाही आपल्या कामगिरीचे श्रेय कधीच मिळाले नाही. सनरायझर्स हैदराबादने २०१६ मध्ये पहिले आयपीएल विजेतेपद पटकावे, त्यावेळी या फलंदाजाचा त्यात मोठा वाटा होता. पण तो मॅच विनर खेळाडू आहे असे कधीही मानले गेले नाही. २०१६ च्या हंगामात त्याने १७ सामन्यांत ५०१ धावा केल्या होत्या. तथापि, या स्टार फलंदाजाला त्याच्या कामगिरीचे श्रेय कधीच देण्यात आले नाही.
यंदाच्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्स कडून खेळत असून आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यात त्याला १२७ धावा करण्यात यश आले आहे.
३. एस बद्रीनाथ –
देशांतर्गत क्रिकेटमधील बरीनाथ हे प्रसिद्ध नाव आहे. आयपीएलच्या ९५ सामन्यांत ३०.६६ च्या सरासरीने १४४१ धावा केल्या आहेत. तामिळनाडूचा हा फलंदाज सीएसकेच्या यशामधील एक महत्वाचा सदस्य होता. तो चेन्नईने जिंकलेल्या २०१० आणि २०११ च्या आयपीएल हंगामात बर्याच प्रसंगी संघासाठी मॅच विनर खेळाडू ठरला होता. संघात दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीमुळे आणि संघात एक चांगला फिनिशर असल्याने त्याची कामगिरी दुर्लक्षित राहिली.
२. सूर्यकुमार यादव –
सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्स संघाचा नियमित खेळाडू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये सर्वांना प्रभावित करणाऱ्या या फलंदाजाकडे, एका क्रिकेटरमध्ये असावे असे सर्व गुण आहेत. तो आयपीएलमध्ये दोन विजयी संघांचा एक भाग होता. २०१४ मध्ये केकेआरकडून आणि २०१९ मध्ये मुंबईतर्फे तो आयपीएल जिंकला आहे. २०१९ मध्ये तो मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज होता.
त्याने आयपीएल २०२० सुरु होण्यापूर्वी ८५ सामन्यात एकूण १५४४ धावा केल्या आहेत. इतकी चांगली कामगिरी असूनही, त्याला अपेक्षेप्रमाणे ओळख मिळाली नाही. यंदाच्या हंगामात तो आतापर्यंत ५ सामने खेळला आहे, त्यात त्याने १०१ धावा केल्या आहेत.
१. स्वप्निल असनोदकर-
उत्कृष्ट स्ट्रोक-खेळाडू म्हणून प्रसिद्ध, स्वप्निल असनोदकर आयपीएल २००८ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. आयपीएलचे पहिले विजेतेपद (२००८) राजस्थानने जिंकले होते. या विजयात या फलंदाजाने मोठी भूमिका बजावली होती. राजस्थान संघाची सलामीची जबाबदारी घेऊन त्याने या २००८ वर्षात महत्वपूर्ण खेळी केल्या होत्या. त्याने ग्रॅमी स्मिथबरोबर नियमित खेळीची सुरुवात केली आणि ९ अर्धशतकांसह ३४.५५ च्या सरासरीने ९ सामन्यांत ३११ धावा केल्या होत्या. जबाबदारीने आपली भूमिका पार पाडल्यानंतरही २००८ मध्ये जेव्हा राजस्थान संघ चॅम्पियन झाला तेव्हा या खेळाडूचा जास्त उल्लेखही झाला नाही.