दोन नव्या संघांसह इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या सिझनला २६ मार्च रोजी सुरुवात झाली होती. थरारक लीग स्टेजनंतर कोलकाता व अहमदाबाद येथे प्ले ऑफचे तीन सामने पार पडले. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवत प्रथमच सहभागी होत असलेल्या गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली, तर अहमदाबाद येथील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत करत फायनलमध्ये जागा मिळवली. या दोन्ही संघांकडे आता विजेतेपद मिळवायचा ‘गोल्डन चान्स’ असेल. त्याचवेळी तुमच्याकडे देखील फँटसी गेम खेळून पैसे कमवण्याची संधी आहे.
प्रथमच आयपीएल (IPL 2022) खेळत असलेली गुजरात (Gujarat Titans) आणि शुभारंभाच्या सिझननंतर पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या संघांमध्ये २९ मे रोजी ही मेगा फायनल होईल. रात्री ८ वाजता नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे सामन्याला सुरुवात होईल.
खेळपट्टीचा विचार केल्यास, दुसऱ्या क्वालिफायरमध्ये ही खेळपट्टी फलंदाजांना पोषक ठरली. त्यामुळे सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना आणि त्यानंतर फलंदाजांना चांगली मदत मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर पारंपारिकरित्या स्पिनर्सला मदत मिळाल्यास नवल वाटायला नको.
महा स्पोर्ट्स ड्रीम इलेव्हनकडे (Dream XI) जाण्यापूर्वी आपण सुरुवातीला दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर नजर टाकूया. लीग स्टेज टॉपर व सर्वात आधी फायनलमध्ये जागा पक्की केलेला, गुजरात टायटन्स संघ वृद्धिमान साहा व शुबमन गिल या जोडीला सलामीची संधी देईल. दोघांनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. मिडल ऑर्डरमध्ये मॅथ्यू वेड, कर्णधार हार्दिक पंड्या व अनुभवी डेव्हिड मिलर दिसू शकतात. मिलर व हार्दिक हे क्वालिफायर एकमध्ये संघाच्या विजयाचे नायक ठरले होते. फिनिशिंगची जबाबदारी पुन्हा एकदा ऑलराऊंडर राहुल तेवतियाच्या खांद्यावर असू शकते. फॉर्ममध्ये असलेला राशिद खान स्पिन डिपार्टमेंटची बाजू भक्कम करेल. त्याला युवा साई किशोर साथ मिळू शकेल. मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्यूसन व यश दयाल हे त्रिकुट वेगवान गोलंदाजीचा भार वाहताना दिसतील.
दुसऱ्या बाजूला क्वालिफायर २ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला धूळ चारत फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्सही आपली बेस्ट इलेव्हन मैदानात उतरवेल. ऑरेंज कॅप होल्डर आणि दोन्ही प्ले ऑफ्समध्ये मॅच विनिंग खेळ करणारा जोस बटलर आणि युवा यशस्वी जयस्वाल संघासाठी ओपनिंग करतील. मिडल ऑर्डरमध्ये कॅप्टन संजू सॅमसन, देवदत्त पड्डीकल व रियान पराग यांना संधी मिळणे जवळपास नक्की आहे. संपूर्ण स्पर्धेत तुफानी कामगिरी केलेल्या शिमरॉन हेटमायरकडून राजस्थानला पुन्हा एकदा चांगल्या फिनिशची अपेक्षा असेल. लीगमधील सर्वात अनुभवी स्पिनर असलेले रविचंद्रन अश्विन व युजवेंद्र चहल राजस्थानला मजबूत बनवतात. चहलचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनू शकतो..स्विंग किंग ट्रेंट बोल्टच्या नेतृत्वात क्वालिफायर २ मध्ये प्रत्येकी तीन बळी मिळवणारे प्रसिद्ध कृष्णा व ओबेद मेकॉय फास्ट बॉलिंग डिपार्टमेंट सांभाळतील.
आता आपण महा स्पोर्ट्स ड्रीम इलेव्हन टीम पाहूया. यष्टीरक्षक म्हणून तुमच्यापुढे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅपचा हकदार असलेला जोस बटलर व राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन हे दोन्ही विकेटकीपर तुम्ही संघात निवडू शकता. फलंदाज म्हणून शुभमन गिल, डेव्हिड मिलर व यशस्वी जयस्वाल तुम्हाला फायदा करून देऊ शकतात. अष्टपैलूची जागा गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या व राहुल तेवतिया भरून काढू शकतात. सुरुवातीला स्विंग गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता असल्याने ट्रेंट बोल्ट व मोहम्मद शमी आपल्या संघाला आणि तुम्हाला फायदा मिळवून देतील. गुजरातचा राशिद खान व राजस्थानचा रविचंद्रन अश्विन या दोन दिग्गज स्पिनर्सचीही तुम्ही आपल्या संघात निवड करू शकता.
आपल्या ड्रीम इलेव्हन टीमचा कर्णधार म्हणून तुम्ही तुफान फॉर्ममध्ये असलेल्या जोस बटलरची निवड करू शकता. तसेच उपकर्णधार म्हणून, राजस्थानविरुद्ध नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करणारा गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या उपयोगी पडेल.
महास्पोर्ट्स ड्रीम ११ –
यष्टीरक्षक – संजू सॅमसन व जोस बटलर (कर्णधार)
फलंदाज – शुभमन गिल, डेव्हिड मिलर, यशस्वी जयस्वाल
अष्टपैलू – हार्दिक पंड्या (उपकर्णधार), राहुल तेवतिया
गोलंदाज – रविचंद्रन आश्विन, राशिद खान, मोहम्मद शमी व ट्रेंट बोल्ट
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL फायनलच्या तिकीटाचे दर पाहून म्हणाल आपला टीव्हीच बरा
IPL च्या समारोपाची जंगी तयारी; मोदी, शहांच्या उपस्थितीत ‘हे’ सेलिब्रेटी करणार परफॉर्मन्स
IPL 2022 | जोस बटलरने पाडला षटकारांचा पाऊस, तर ‘या’ खेळाडूने मारला सर्वात लांब षटकार