इंडियन प्रीमियर लीग आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी सोमवारचा दिवस (३ मे) विसरण्याजोगा राहिला. कोलकाता नाईट रायडर्स संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध अहमदाबाद येथे होणारा सामना पुढे ढकलण्यात आला. याबरोबरच दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील काही कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात सापडले.
यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाने बीसीसीआयला बुधवार रोजी दिल्ली येथे होणारा आगामी खेळण्यास नकार दिल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. बुधवार रोजी (०५ मे) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ३१ वा सामना होणार होता.
सोमवारी चेन्नई संघातील ३ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने चेन्नई संघाने हा सामना खेळण्यास नकार दिला आहे. चेन्नईचे सीईओ कासी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बस चालक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता. त्यांना त्यांना ७ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.
त्यामुळे जर चेन्नई संघातील कोरोना संक्रमित सदस्यांच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंनी त्यांची कोरोना चाचणी करुन घेतली, तरच चेन्नईचा संघ पुढील सामन्यासाठी मैदानावर उतरणार असल्याचे चेन्नईच्या अधिकाऱ्याने बीसीसीआयला सांगितले आहे. याबरोबरच राजस्थानविरुद्धचा सामना इतर कोणत्या दिवशी खेळवण्यात यावा, अशी विनंतीही चेन्नईच्या अधिकाऱ्याने बीसीसीआयला केली आहे.
चेन्नईचे अधिकारी म्हणाले की, “प्रशिक्षकांची जरी कोरोनाची बाधा झाली असली, तरीही त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. परंतु बीसीसीआयने बनवलेल्या कोरोनाच्या नियमांनुसार कोरोना संक्रमित व्यक्तीला ६ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. आम्ही आमचा पुढील सामना (राजस्थानविरुद्ध) खेळू शकत नाही.”
Update: Wednesday's IPL game between the Chennai Super Kings and the Rajasthan Royals has been rescheduled https://t.co/C4zSsDNaGU #RRvCSK #IPL2021 https://t.co/ElRHYEY2iq
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 4, 2021
“संघातील काही सदस्य पॉझिटिव्ह आढळ्यानंतर इतरांचीही कोरोना चाचणी होणे आणि त्यांचे अहवाल निगेटिव्ह येणे किती गरजेचे आहे याची बीसीसीआयला कल्पना आहे. याचमुळे आम्ही बीसीसीआयशी संवाद साधला आहे. याबरोबरच आमचा राजस्थानविरुद्धचा येता सामना इतर कोणत्या दिवशी घेण्याची विनंती केली आहे,” असे ते पुढे म्हणाले.
चेन्नई संघाच्या विनंतीला मान देत बीसीसीआयने हा सामना पुढे ढकलण्याचे ठरवले आहे. एकाच आठवड्यातील दुसरा सामना कोरोनामुळे रद्द होण्याची ही दुसरी वेळ आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलला कोरोनाने घेरले; बीसीसीआयने तयार केला बॅकअप प्लॅन, ‘या’ शहरात होतील पुढील सामने?
‘बाबाची गंगम स्टाईल’; लाडक्या लेकीसोबत बटलरचा झक्कास डान्स, पाहून तुमचेही थिरकतील पाय
दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! घरी परतलेल्या अश्विनचे होणार पुनरागमन, ‘या’ दिवशी येण्याची शक्यता






