सन २००८ मध्ये सुरू झालेली आयपीएल ही भारतीयच नव्हे तर, जागतिक क्रिकेटमधील एक क्रांतीकारी घटना होती. अनेक वरिष्ठ खेळाडूंचे बुडते करियर या आयपीएलने वाचवले आणि काही युवा खेळाडूंना नवीन ओळख आयपीएलमधून मिळाली. मैदानांवर असा झगमगाट, डोळ्यात डोळे घालून खूनशीने खेळणारे विविध देशांचे क्रिकेटपटू खांद्याला खांदा लावुन खेळत होते, मैदानाच्या बाजूला चिअर लीडर्स आणि प्रेक्षकांत मोठे सेलिब्रिटी असे चित्र यापूर्वी कोणीही पाहिले नव्हते.
आयपीएलसाठी जे सर्व संघ निवडले गेले होते, त्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठमोठे दिग्गज खेळाडू होते, अपवाद होता राजस्थान रॉयल्स संघाचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला शेन वॉर्न प्रशिक्षक आणि कर्णधार अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणार होता. साथीला ग्रॅमी स्मिथ होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेले शेन वॉटसन, सोहेल तन्वीर व कामरान अकमल यांसारखे त्यावेळी फारसे परिचित नसणारे विदेशी खेळाडू संघात होते.
भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंविषयी बोलायचं झाले तर फक्त मोहम्मद कैफ संघात होता. नाण्याची दुसरी बाजू अशी की, दोन वर्षापासून त्याने देखील भारतीय संघाची निळी जर्सी घातली नव्हती. मुनाफ पटेल नुकताच भारतासाठी खेळू लागला होता आणि युसुफ पठाणने केवळ एकाच सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले. बाकी सारा संघ नवखा. मात्र, या सर्वांमध्ये वॉर्नने असा काही उत्साह भरला की, सर्व संघांना पछाडत राजस्थानने पहिल्या आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले. राजस्थानला हे विजेतेपद मिळवून देण्यात एका गोव्याच्या खेळाडूचा मोलाचा वाटा होता आणि तो खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक सलामीवीर ‘स्वप्निल असनोडकर’.
एका फोनने बदलले आयुष्य
गोवा संघासाठी खेळणारा स्वप्निल पहिल्यांदाच जाहीर झालेल्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक होता. मागील देशांतर्गत हंगामात त्याने चांगल्या धावा केल्या होत्या. त्याला अपेक्षा होती की, गोव्याचे शेजारी राज्य असलेल्या कर्नाटकमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर त्याला आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र ही गोष्ट शक्य होऊ शकली नाही. तो काहीसा निराश झाला.
अचानक एके दिवशी सायंकाळी स्वप्निलला राजस्थान रॉयल्स संघ व्यवस्थापनाकडून फोन आला आणि त्यांनी त्याला करारबद्ध होण्याविषयी विचारले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. संघात निवडले गेल्यानंतर जयपूर येथे पाचदिवसीय शिबिर आयोजित केले होते. स्वतः शेन वॉर्न सर्व खेळाडूंवर नजर ठेवून होता. भारतातील खेळाडूंविषयी जास्त माहिती नसल्याने त्याने स्वप्निलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. तिथे चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला पुढील दोन सराव सामन्यांमध्ये सलामीची संधी मिळाली आणि त्याने ते दोन्ही सामने गाजवले.
‘छोटा पॅकेट बडा धमाका’
प्रमुख स्पर्धा सुरू झाल्यानंतर पहिल्या काही सामन्यात तो बाकांवर बसून होता. मात्र, संधी मिळताच कोलकत्ता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात ३४ चेंडूमध्ये ६० धावा फटकावून त्याने सर्वांची मने जिंकली. त्यानंतर सर्व स्पर्धा आपल्या लॉफ्टेड ड्राईव्हने, पुल, हुक आणि उत्तुंग षटकारांनी गाजवली. त्याने आपल्या फटकेबाजीने अक्षरशः आपला सलामीचा साथीदार आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथला झाकोळून टाकले. त्या हंगामात ९ सामने खेळताना १३३.४७ च्या स्ट्राइक रेटने त्याने ३११ धावा फटकावत राजस्थानच्या विजेतेपदात मोठा हातभार लावला. याचवेळी त्याला ‘छोटा पॅकेट बडा धमाका’ असे म्हटले जाऊ लागले होते.
… आणि गोव्याची तोफ थंड झाली
पहिली आयपीएल गाजवल्यानंतर तो भारतीय संघात खेळणार असे सर्वजण म्हणू लागले. मात्र, कदाचित त्याच्या नशिबात इतकेच यश लिहिले होते. आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. पुढील दोन हंगामात मिळून त्याला केवळ तीन सामने खेळायला मिळाले. त्यानंतर अनेकदा आयपीएल लिलावात नाव देऊनही त्याला कोणीही खरेदी केले नाही. २०११ नंतर तो पुन्हा कधीही आयपीएलमध्ये खेळताना दिसला नाही. शेन वॉर्नने म्हटलेली ‘गोव्याची तोफ’ लवकरच थंड झाली.
निवृत्तीनंतर बनला प्रशिक्षक
पुढे तो गोव्याच्या रणजी संघाचा कर्णधार बनला. २०१८ पर्यंत त्याने ही जबाबदारी पार पाडली. यादरम्यान त्याने काही चांगल्या खेळ्या केल्या. परंतु, आयपीएल आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या पुरेश्या नव्हत्या. २०१९ मध्ये स्वप्निल आणि गोव्याचा दुसरा अनुभवी खेळाडू शादाब जकाती यांना या कारणाने गोवा संघाबाहेर केले गेले की, त्यांच्यामुळे तरुण खेळाडूंची जागा अडवली जात आहे. हा त्याच्यासाठी मोठा धक्का होता. या घटनेनंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेत गोव्याच्या तेवीस वर्षाखालील संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले. तो सध्या आपल्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंना पैलू पाडण्याचे काम करत आहे.
स्वप्निल सोबतच कारकीर्दीची सुरुवात करणारे रवींद्र जडेजा, शिखर धवन, विराट कोहली आणि मनीष पांडे हे खेळाडू सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहेत. मात्र, त्यांच्या इतकीच प्रतिभा असणारा स्वप्निल सातत्य आणि नशीब या दोन्ही गोष्टीत कमी पडल्याने गुमनामीच्या अंधारात ढकलला गेला.
वाचा –
जेव्हा पहिला भारतीय त्रिशतकवीर होण्याची भविष्यवाणी सेहवागने ३ वर्ष आधीच केली होती…
IPL 2022 | एक ‘गावकरी’ आणि एक ‘नावकरी’, दोघांनी मिळून KL राहुलच्या स्वप्नांना लावला सुरुंग
भारतीय क्रिकेटचे पहिले विक्रमादित्य ‘पॉली उम्रीगर’, कर्णधारपद सोडले पण निर्णय नाही बदलला!