आयपीएल 2024 चे प्लेऑफ सामने आजपासून सुरू होणार आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. तर एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमनेसामने होतील.
आयपीएलच्या साखळी टप्प्यात फलंदाजांनी अनेक विक्रम केले. प्लेऑफ सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, आयपीएलच्या इतिहासात अनेक फलंदाजांनी झंझावाती आणि स्फोटक खेळी खेळल्या आहेत. परंतु अशा 3 खेळी आहेत, ज्यांनी सर्व प्रेक्षक थक्क झाले आणि त्या खेळी आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत.
सुरेश रैना विरुद्ध पंजाब किंग्ज (आयपीएल 2014, क्वालिफायर 2)
आयपीएल 2014 मधील दुसरा क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघानं 226/6 अशी मोठी धावसंख्या उभारली. पंजाबसाठी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं शानदार शतक झळकावलं. त्यानं 122 धावांची तुफानी खेळी खेळली. परंतु सुरेश रैनाच्या झंझावातासमोर सेहवागची ही खेळी फिकी पडली.
चेन्नई सुपर किंग्जनं पॉवरप्लेच्या 6 षटकांत 100 धावांचा टप्पा पार केला, ज्यामध्ये रैनाचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. रैनानं अवघ्या 25 चेंडूत 87 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यात त्यानं 12 चौकार आणि 6 षटकार ठोकले. मात्र, तो धावबाद झाल्यानंतर चेन्नईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही आणि संघ 24 धावांनी पराभूत झाला.
एबी डिव्हिलियर्स विरुद्ध गुजरात लॉयन्स (आयपीएल 2016, क्वालिफायर 1)
2016 हे वर्ष आरसीबीसाठी आतापर्यंतचे सर्वोत्तम आयपीएल वर्ष ठरलं आहे. त्या मोसमात बंगळुरू संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, अंतिम सामन्यात त्यांचा सनरायझर्स हैदराबादकडून पराभव झाला. त्याआधी क्वालिफायर 1 मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सनं अशी इनिंग खेळली, जी आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.
गुजरात लॉयन्सनं दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीनं पहिल्या 5 विकेट 29 धावांतच गमावल्या होत्या. पण इथून पुढे डिव्हिलियर्सनं स्टुअर्ट बिन्नीसोबत 39 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि त्यानंतर इक्बाल अब्दुल्लासह 81 धावांची मॅच विनिंग भागीदारी केली. एबी डिव्हिलियर्स शेवटपर्यंत टिकून राहिला आणि त्यानं 10 चेंडू बाकी असताना सामना संपवून आरसीबीला अंतिम फेरीत नेलं. एबीनं 47 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 79 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.
रजत पाटीदार विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (आयपीएल 2022, एलिमिनेटर)
आयपीएल 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात, आरसीबीचा युवा फलंदाज रजत पाटीदारनं शानदार शतक झळकावून आपल्या संघाला क्वालिफायर 2 मध्ये नेलं होतं. रजतनं 54 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांसह 112 धावा केल्या. पाटीदारनं शेवटच्या 41 चेंडूत दिनेश कार्तिकसोबत 92 धावांची तुफानी भागीदारी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! यावर्षी हैदराबाद बनणार चॅम्पियन! आयपीएल 2016 अन् आयपीएल 2024 मध्ये ‘या’ गोष्टी आहेत समान
टीम इंडियाचा हेड कोच निवडण्यात धोनीची भूमिका ठरणार महत्त्वाची! बीसीसीआयनं सोपवली मोठी जबाबदारी






