इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६चा हंगाम काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. त्यामधील राजस्थान रॉयल्स संघासंबधित मोठे वृत्त समोर येत आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ कल सोमानी (Kal Somani) यांच्या नेतृत्वाखालील एका समूहाने (Consortium) विकत घेतला आहे. अमेरिकेत स्थायिक असलेल्या या भारतीय वंशाच्या उद्योगपतीने राजस्थान फ्रॅंचायजीचा संपूर्ण १०० टक्के भाग १.६३ अब्ज डॉलर्स (जवळपास १५,३०० कोटी रुपये) एवढ्या रकमेत विकत घेतला आहे.
हा व्यवहार आयपीएल फ्रॅंचायजीच्या इतिहासातील सर्वात महागडा व्यवहार मानला जात आहे. या गटामध्ये सोमानी यांच्यासोबत अमेरिकन उद्योगपती रॉब वॉल्टन (वॉलमार्ट) आणि शीला फोर्ड हॅम्प (फोर्ड) यांचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, हा मालकी हक्क २०२६ च्या आयपीएल हंगामानंतर लागू होणार आहे.
सोमानी यांनी एड-टेक, डेटा प्रायव्हसी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स गव्हर्नन्स आणि स्पोर्ट्स टेक या क्षेत्रांमधील उद्योगांचे नेतृत्व केले आहे. तसेच ते इंट्राएज, ट्रुयो, ट्रुयो.एआय आणि अकॅडेमियन यांसारख्या जागतिक स्तरावरील कंपन्यांचे संस्थापक आहेत.
सोमानी यांनी राजस्थान फ्रॅंचायजीमध्ये २०२१ पासून गुंतवणूक केली आहे. ते तेव्हा म्हणाले होते, “आम्हाला या गुंतवणुकीत प्रचंड क्षमता दिसत आहे आणि आम्ही आयपीएलच्या भविष्याबद्दल उत्साहित आहोत.”
पहिल्या हंगामाआधी बीसीसीआयने विकलेली ही सर्वात स्वस्त फ्रॅंचायजी होती. आता ती १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीला विकला जाणारा हा पहिला आयपीएल संघ ठरला आहे.
सध्यातरी या व्यवहाराच्या करारावर अधिकृत स्वाक्षरी झाली असून घोषणा झालेली नाही, मात्र आज (२४ मार्च) संध्याकाळपर्यंत त्याची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
याआधी राजस्थानचा मालकी हक्क ब्रिटिश-भारतीय उद्योगपती मनोज बदाले यांच्या नेतृत्वाखालील इमर्जिंग मीडिया व्हेंचर्सकडे होता. २००८ च्या आयपीएलआधी ही फ्रॅंचायजी इमर्जिंग मीडिया व्हेंचर्सने ६७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सला विकत घेतली होती.
आयपीएलमधील असे अनेक फ्रॅंचायजी आहेत, ज्यांना विक्रमी खरेदी मिळाली आहे. संजीव गोयंका याच्या आरपीएसजी ग्रुपने लखनऊ सुपर जायंट्स ९४० दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले होते. तसेच टॉरेंट ग्रुपने गुजरात टायटन्समधील ६७ टक्के भाग ५७५ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केला होता.
त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) फ्रॅंचायजीच्या विक्रीबाबत चर्चा सुरू आहे. त्याची विक्री या वर्षाअखेरीस पूर्ण होणार असल्याचे समजते. त्यामुळे १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक खरेदी किंमत मिळालेला राजस्थान हा एकमेव संघ राहणार नाही, कारण आरसीबीलाही १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक विक्री किंमत मिळण्याची दाट शक्यता आहे.






