राजस्थान रॉयल्स हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सर्वात रोमांचक संघांपैकी एक आहे. 2008 साली पहिल्या हंगामातच हा संघ विजेता ठरला होता. या संघाने अनेक प्रतिभावान खेळाडूंना संधी दिली असून नेतृत्वाच्या बाबतीतही विविध अनुभवी व युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत सहा वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली सामने खेळले आहेत.
सध्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार असलेल्या संजू सॅमसनने 2021 पासून संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 61 सामने खेळले आहेत. ज्यात सॅमसनने 31 विजय मिळवले तर 29 सामन्यात पराभव पत्करावे लागले. युवा आणि आक्रमक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजूने संघाला अनेक रोमांचक विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थानने 2022 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न हा राजस्थान रॉयल्सचा पहिला कर्णधार होता. 2008 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने IPLचे पहिले विजेतेपद पटकावले. एक प्रभावी आणि प्रेरणादायी कर्णधार म्हणून वॉर्नने 56 सामने खेळवत संघाला एक वेगळी ओळख मिळवून दिली.
भारतीय क्रिकेटचा ‘भिंत’ म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा कर्णधार 2012 आणि 2013 या दोन हंगामांसाठी होता. त्याने 40 सामने खेळवत संघाला स्थिरता दिली आणि युवा खेळाडूंना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
ऑस्ट्रेलियाचा प्रतिभावान फलंदाज स्टीव्ह स्मिथने 2014 ते 2020 दरम्यान राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने 27 सामने खेळले. स्मिथच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली कामगिरी केली होती, मात्र त्यावेळी संघ फार पुढे जाऊ शकला नाही.
भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज अजिंक्य रहाणे 2018 आणि 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने 24 सामने खेळले. रहाणेने आपल्या संयमी आणि हुशार कर्णधारपदामुळे संघाला स्थिरता दिली, मात्र मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसननेही राजस्थान रॉयल्ससाठी नेतृत्व केले आहे. 2008 ते 2015 या कालावधीत त्याने संघासाठी 21 सामने खेळवत नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने काही महत्त्वाचे विजय मिळवले.
राजस्थान रॉयल्सने नेहमीच कर्णधार निवडीत नाविन्यपूर्णता दाखवली आहे. अनुभवी तसेच युवा खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा पायंडा राहिला आहे. 2008 मधील विजेतेपदाच्या आठवणींना उजाळा देत संघ आता पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे.
राजस्थान राॅयल्सचे आजपर्यंतचे कर्णधार
संजू सॅमसन
2021-24
सामने – 61
शेन वाॅर्न
2008-11
सामने – 56
राहुल द्रविड
2012-13
सामने – 40
स्टीव्ह स्मिथ
2014-20
सामने – 27
अजिंक्य रहाणे
2018-19
सामने 24
शेन वाॅटसन
2008-15
सामने 21