इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. इंग्लंडला या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकण्यात यश आले. तर शेवटचा टी-२० सामना ऑस्ट्रेलिया संघाने ५ गडी राखून जिंकला, पण ही मालिका गमावली. या मालिकेत असे अनेक खेळाडू खेळत आहेत, जे आयपीएल २०२० मध्येसुद्धा खेळताना दिसतील.
परंतु, या मालिकेत ५ खेळाडूंची कामगिरी पाहून त्यांचे आयपीएलचे संघ खूप निराश होतील. या लेखात त्या ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.
स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स)
स्टीव्ह स्मिथ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार आहे आणि सध्या स्तिथीत त्याला सर्वोत्कृष्ट फलंदाज देखील मानले जाते, परंतु इंग्लंडचा दौरा या अनुभवी फलंदाजासाठी खराब सिद्ध होत आहे.
स्मिथ पहिल्या टी-२० सामान्यामध्ये १७ धावा करुन बाद झाला होता. तर दुसर्या टी-२० सामन्यात त्याच्या फलंदाजीतून केवळ ११ धावा आल्या. तसेच नुकत्याच पार पाडलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने ४ चेंडूत ३ धावा केल्या. अशा प्रकारे त्याने ३ सामन्यांत केवळ ३१ धावा केल्या आहेत.
स्टीव्ह स्मिथचा हा खराब फॉर्म आयपीएल २०२० पूर्वी राजस्थान रॉयल्स संघासाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे.
जॉनी बेयरस्टो (सनरायझर्स हैदराबाद)
सनरायझर्स हैदराबादच्या जॉनी बेअरस्टोने ३ टी-२० सामन्यात आपल्या संघासाठी ७२ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२० मध्ये जॉनी बेअरस्टो सनरायझर्स हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरसोबत सलामीची जबाबदारी सांभाळणार आहे, परंतु त्याचा खराब फॉर्म सनरायझर्ससाठी चिंतेचा विषय बनला आहे.
पहिल्या टी-२० सामन्यात जॉनी बेअरस्टोने ८ धावा केल्या आणि दुसर्या टी-२० सामान्यामध्ये ११ चेंडूत केवळ ९ धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात त्याने ४४ चेंडूत ५५ धावांची जबरदस्त खेळी केली. परंतु तिसऱ्या सामन्यात त्याचा इंग्लंड संघाला पराभव पत्करावा लागला.
अॅलेक्स कॅरी (दिल्ली कॅपिटल)
अॅलेक्स कॅरीसाठी इंग्लंडचा हा दौरा निराशाजनक ठरला असेल. आयपीएल २०२० मध्ये तो दिल्ली कॅपिटलसाठी खेळणार आहे, पण त्याचा फॉर्म इतका खराब आहे की दिल्ली कॅपिटल संघाच्या अंतिम अकरामध्ये स्थान मिळविणे त्याला कठीण जाईल.
पहिल्या टी-२० सामन्यात तो फक्त १ धावा करुन बाद झाला. दुसर्या टी-२० सामन्यात त्याच्या फलंदाजीतून केवळ २ धावा आल्या. त्याच्या खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेच्या तिसर्या टी-२० सामन्यात त्याला संधी दिली नाही
अॅलेक्स कॅरीच्या जागी ऑस्ट्रेलिया मॅथ्यू वेडला तिसर्या टी-२० सामन्यात संधी मिळाली.
ओएन मॉर्गन (केकेआर)
इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन ही या मालिकेत फारसा यशस्वी ठरला नाही. पहिल्या टी-२० सामन्यात मॉर्गन ५ धावांवर बाद झाला. तर दुसर्या टी-२० सामन्यात मॉर्गन केवळ ७ धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. तसेच मालिकेच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने २१ चेंडूंमध्ये २३ धावा केल्या.
मॉर्गन आयपीएल २०२० मध्ये केकेआरकडून खेळणार आहे आणि केकेआर त्याला मॅच फिनिशरची भूमिका देणार आहे, परंतु सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो आपली भूमिका बजावण्यात अपयशी ठरला. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सलाही हा प्रश्न पडला असेल की ते आपल्या संघासाठी मॅच फिनिशरची कामगिरी चांगल्या प्रकारे पार पाडेल की नाही.
अॅडम झम्पा (आरसीबी)
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने आयपीएल २०२० मधून माघार घेतली असून आता आरसीबीने फिरकीपटू अॅडम झम्पाला त्याच्या संघात समाविष्ट केले आहे.
परंतु, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला. त्या दृष्टीने आरसीबीला त्यांच्या निर्णयाबद्दल खेद वाटत असेल.
पहिल्या टी-२० सामन्यात जंपाने ४ षटकांत एकूण ४७ धावा खर्च केल्या. त्याचबरोबर दुसर्या टी-२० सामन्यात त्याने ३.५ षटकांच्या गोलंदाजीत एकूण ४२ धावा केल्या. तर तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात त्याने ४ षटकांत ३४ धाव देत २ गडी बाद केले. या मालिकेत आतापर्यंत त्याने केवळ ३ बळी मिळविले आहेत. त्यांच्या खराब कामगिरीमुळे आरसीबीची चिंता वाढली आहे.