इंडियन प्रीमीयर लीगमध्ये आत्तापर्यंत अनेक खेळाडूंना कोट्यावधी रुपये मिळाले आहेत. आयपीएल ही स्पर्धा तशी खेळ व मनोरंजनाचे अतिशय उच्च दर्जाचे मिश्रण.
त्यामुळे क्रिकेटर खेळाबरोबरच येथे कमाईलाही अतिशय महत्त्व देतात. काही क्रिकेटर तर देशासाठी क्रिकेट खेळण्यापुर्वी आयपीएलला याच कारणामुळे प्राधान्य देतात.
त्यातही जेव्हा अष्टपैलू खेळाडू म्हटलं की त्यांना अधिक पसंती मिळते. कारण ते गोलंदाजी आणि फलंदाजीही करत असल्याने संघात समतोल राखला जातो.
असेच आयपीएलमध्ये कोट्यावधी रुपयांची कमाई करणारे हे ५ अष्टपैलू क्रिकेटपटू –
१. शेन वॉट्सन –
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉट्सनने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अनेक संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. वॉट्सनने आत्तापर्यत आयपीएलमध्ये अनेक महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत.
तो सर्वात आधी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे. त्याच्यासाठी राजस्थानने २००८ ला ५० लाखांहून अधिक रुपये मोजले होते. तो राजस्थानकडून २०१५ पर्यंत खेळला. राजस्थानने त्याच्यासाठी २०११ ते २०१३ पर्यंत ५ कोटींहून अधिक रक्कम मोजली. तर २०१४ आणि २०१५ साठी त्यांनी १२.५ कोटी रुपये त्याला दिले.
२०१६ मध्ये वॉट्सन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामील झाला. तो तिथे २ वर्षे खेळला. त्याच्यासाठी त्यांनी दोन्ही मोसमात ९.५ कोटी रुपये मोजले. वॉट्सनला २०१८ ला चेन्नई सुपर किंग्सने ४ कोटी रुपयांना खरेदी केले असून तो आता सध्या चेन्नईचा भाग आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १३४ सामने खेळले असून ३५७५ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ९२ विकेट्सही घेतल्या आहेत.
२. रविंद्र जडेजा –
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आयपीएलमध्ये ४ संघांकडून आत्तापर्यंत खेळला आहे. त्याला २००८ ला राजस्थान रॉयल्सने १२ लाखाला खरेदी केले होते. तो २००८ आणि २००९ ला राजस्थानकडून खेळला. त्यानंतर २०१० ला त्याच्यावर आयपीएलचा नियम मोडण्याबद्दल बंदी घालण्यात आली होती. पण २०११ त्याने पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन केले त्याला २०११ ला कोची टस्कर्स केरलाने ४ कोटी ३७ लाख दिले.
२०१२ ला त्याला चेन्नई सुपर किंग्सने ९.२ कोटी रुपयांना खरेदी केले. २०१३ लाही चेन्नईने त्याला ९.२ कोटी रुपये दिले. तर २०१४ आणि २०१५ ला चेन्नईने त्याच्यासाठी प्रत्येकी ५.५ कोटी रुपये मोजले. २०१६ आणि २०१७ चेन्नईवर बंदी आल्याने तो गुजरात लायन्सकडून खेळला. २०१६ ला त्याला गुजरातने ५.५ कोटी रुपये दिले. तर २०१७ ला त्याच्यासाठी गुजरातने ९.५ कोटी खर्च केला.
तर २०१८ पासून त्याला चेन्नईने त्याला ७ कोटी रुपयांना संघात कायम केले आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १७० सामन्यात १९२७ धावा केल्या आहेत आणि १०८ विकेट्स घेतल्या आहेत.
३. किरॉन पोलार्ड
वेस्ट इंडिज संघाच्या मर्यादीत षटकांचा कर्णधार किरॉन पोलार्ड आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारा तिसऱ्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे. तो २०१० पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मुंबईने त्याला सर्वात पहिल्यांदा २०१० ला ३.४ कोटी रुपये देऊन संघात घेतले होते. २०११ पासून ते २०१४ पर्यंत मुंबईने त्याच्यासाठी प्रत्येकवर्षी ४ कोटींहून अधिक खर्च केला.
२०१५ ते २०१७ पर्यंत त्याला मुंबईने प्रत्येकवर्षी ९.५ कोटी रुपये त्याला दिले. तर २०१८ ला त्याला त्यांनी ५.४ कोटी रुपयांना मुंबईने कायम केले. पोलार्ड आत्तापर्यंत मुंबईने जिंकलेल्या आयपीएलच्या ४ विजेतेपदांमध्ये सहभागी होता. त्याने आत्तापर्यंत १४८ सामने मुंबईकडून खेळले असून २७५५ धावा केल्या आहेत. तर ५६ विकेट्स घेतल्या आहेत.
४. आर अश्विन –
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू आर अश्विनला २००८ ला चेन्नई सुपर किंग्सने १२ लाखाला खरेदी केले होते. त्याला पुढचे २ मोसमातही १२ लाख रुपये मिळाले. त्यानंतर चेन्नईने त्याला २०११ ला संघात कायम करताना २०१३ पर्यंत प्रत्येकी ३ कोटी ९१ लाख रुपये दिले. तर २०१४ आणि २०१५ ला ७.५ कोटी रुपये त्याच्यासाठी चेन्नईने मोजले.
२०१६ आणि २०१७ ला चेन्नईवर बंदी आल्याने तो रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला. या दोन्ही मोसमासाठी त्याला प्रत्येकी ७.५ कोटी रुपये मिळाले. २०१८ ला त्याला ७.६ कोटी रुपयांना किंग्स इलेव्हन पंजाबने विकत घेतले. पंजाबकडून तो २ मोसमात खेळला. तसेच त्याने पंजाबचे कर्णधारपदही सांभाळले.
२०२० साठी त्याला दिल्लीने पंजाबकडून ७.६ कोटी रुपयांनाच विकत घेतले. अश्विनने आयपीएलमध्ये १३९ सामने खेळले असून ३७५ धावा केल्या आहेत आणि १२५ विकेट्स घेतल्या आहेत.
५. ख्रिस गेल –
वेस्ट इंडिजचा आक्रमक क्रिकेटपटू ख्रिस गेलने आत्तापर्यंत अनेकदा तुफानी खेळी केल्या आहेत. त्याला आयपीएलमध्ये २००८ ला कोलकाता नाईट रायडर्सने ३ कोटी २१ लाखाला खरेदी केले होते. त्याला २०१० पर्यंत कोलकाताने ३ कोटींहून अधिक पैसे दिले. तो २०११ ला रॉयल चॅलेंजर्स संघाशी जोडला गेला. त्याच्यासाठी बेंगलोरने २०१३ पर्यंत २ कोटींहून अधिक रक्कम मोजली.
२०१४ ला बेंगलोरने त्याच्यासाठी ७.५ कोटी रुपये खर्च करुन त्याला संघात कायम केले. २०१७ पर्यंत बेंगलोरने त्याला ७.५ कोटी रुपये दिले. २०१८ पासून त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने २ कोटी रुपयांना कायम केले आहेे. त्याने आत्तापर्यंत १२५ आयपीएल सामन्यात ४४८४ धावा केल्या आहेत. तर १८ विकेट्स घेतल्या आहेत.