गुरुवारी (८ ऑक्टोबर) दुबई येथे झालेल्या आयपीएल २०२०च्या २२व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबला ६९ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात एक अनोखी गोष्ट पहायला मिळाली, ती म्हणजे एकाच चेंडूवर २ रिव्ह्यू घेण्यात आले. ही गोष्ट पंजाब संघ हैदराबादने दिलेल्या २०२ धावांचा पाठलाग करत असताना घडली.
झाले असे की १४ व्या षटकात हैदराबादकडून खलील अहमद गोलंदाजी करत होता. यावेळी त्याने पाचवा चेंडू फुल लेंथचा टाकला. त्यावेळी पंजाबकडून फलंदाजी करत असलेल्या मुजीब उर रेहमानने बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो चेंडू बॅटच्या जवळून जात यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोच्या हातात गेला.
त्यामुळे बेअरस्टो आणि अन्य हैदराबादच्या खेळाडूंनी यष्टीमागे झेलबादचे अपील केले. यावेळी हैदाराबादला वाटत होते की चेंडू बॅटची कड घेऊन बेअरस्टोच्या हातात गेला आहे. पण त्यावेळी पंचांनी नाबाद दिले. याववर हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरनेही डिआरएस रिव्ह्यू घेतला नाही. पण काही क्षणातच मैदानावरी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना बंपबॉलची शंका होती. पण रिव्ह्यूमध्ये दिसले की चेंडू हलकासा बॅटची कड घेऊन बेअरस्टोच्या हातात गेला आहे. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी मुजीबला बाद दिले. पण यावेळी मैदानावरील पंचांनी रिव्ह्यू घेतलेला असल्याने त्यात अल्ट्रा एज दाखवले गेले नाही.
त्यावेळी तिसऱ्या पंचांनी मुजीबला बाद दिल्यानंतर तो काही पावले पुढे गेला आणि पुन्हा मागे येऊन त्याने डिआरएसची मागणी केली. हे पाहून सर्वच जण चकीत झाले. यावेळी समालोचन कक्षात अशीही चर्चा झाली की कदाचीत ड्रेसिंगरुममधून कोणीतरी त्याला डिआरएस घेण्यास सुचवले. यावेळी फलंदाजाने रिव्ह्यू घेतल्याने अल्ट्रा एज दाखवण्यात आले, आणि त्यात मुजीबच्या बॅटला चेंडू लागल्याचे स्पष्ट झाले. अखेर मुजीबला पॅव्हेलियनमध्ये परतावेच लागले. मात्र या घटनेची क्रिकेटवर्तुळात बरिच चर्चा झाली.