मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांच पाहायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्सने संघाने ४ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात राजस्थानने पंजाबला २२२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, अखेरच्या चेंडूवर शतकी खेळी करणारा सॅमसन षटकार मारण्याच्या नादात बाद झाला आणि हा सामना पंजाबने जिंकला. राजस्थानला २० षटकांत २१७ धावा करता आल्या.
अखेरच्या २ षटकांत राजस्थानला २१ धावांची गरज असताना राहुल तेवातिया १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर २ धावांवर बाद झाला. पण सॅमसनने या षटकात एक षटकार मारला. तसेच ख्रिस मॉरिससह त्याने या षटकात ८ धावा काढल्या.
त्यामुळे अखेरच्या षटकात राजस्थानला १३ धावांची गरज होती. पंजाबकडून हे षटक अर्शदिप सिंग टाकत होता. या षटकाच्या पहिल्या ३ चेंडूत २ धावा निघाल्या. पण चौथ्या चेंडूवर सॅमसनने पुन्हा एक खणखणीत षटकार ठोकत आपले इरादे पक्के केले. पाचव्या चेंडू निर्धाव गेला. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर ५ धावांची गरज असताना सॅमसनने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाँग ऑफला बाउंड्री जवळ उभ्या असलेल्या दिपक हुडाने त्याचा झेल घेतला, त्यामुळे अखेर राजस्थानला पराभवाचा सामना करावा लागला. सॅमसनने ६३ चेंडूत ११९ धावा करताना १२ चौकार आणि ७ षटकार मारले.
पंजाबकडून अर्शदिपने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने २ आणि रिली मेरेडिथने १ विकेट घेतली.
सॅमसनचे शतक
राजस्थानकडून सलामीला बेन स्टोक्स आणि मनन वोहरा उतरले होते. मात्र, स्टोक्सला शुन्यावर पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने स्वत:च्याच चेंडूवर झेल घेत बाद केले. त्यापोठापाठ चौथ्या षटकात मनन देखील अर्शदिप सिंगच्या गोलंदाजीवर १२ धावा करुन बाद झाला. यानंतर मात्र, संजू सॅमसन आणि जोस बटलरने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यांची ४५ धावांची भागीदारी झाली असताना बटलर १३ चेंडूत २५ धावा करुन झाय रिचर्डसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. पण तरीही शिवम दुबेच्या साथीने संजू सॅमसनने खेळ सुरु ठेवला. दरम्यान कर्णधाराला साजेशी अशी खेळी करताना सॅमसनने ३३ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
पण, दुबे २३ धावांवर आणि नंतर रियान पराग २५ धावांवर आक्रमक खेळी करुन बाद झाले. असे असचानाही संजू सॅमसनने आक्रमक खेळत ५४ चेंडूत शतक पूर्ण केले.
१८ षटकांत राजस्थानने ५ बाद धावा केल्या असून त्यांना शेवटच्या २ षटकांत २१ धावांची गरज होती.
पंजाबचे राजस्थानला २२२ धावांचे आव्हान
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. या आमंत्रणाचा स्विकार करत पंजाबच्या फलंदाजांना राजस्थाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. पंजाबने २० षटकांत ६ बाद २२१ धावा केल्या आहेत. तसेच राजस्थानला २२२ धावांचे आव्हान दिले आहे.
पंजाबने १६ षटकांतच १७० धावांचा टप्पा पार केल्यानंतर २८ व्या षटकांत दिपक हुडा ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २८ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याच्यापाठोपाठ त्याच षटकात निकोलस पूरन शुन्यावर बाद झाला. त्याचा शानदार झेल चेतन सकारियाने घेतला. पण केएल राहुलने चांगल्या लयीत खेळणे सुरु ठेवले होते. मात्र, अखेरच्या षटकांत तो सकारियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल बाऊंड्री लाईनजवळ राहुल तेवतियाने अफलातून झेलला. त्यामुळे राहुलला ७ चौकार आणि ५ षटकारांसह ५० चेंडूत ९१ धावांची खेळी करुन बाद व्हावे लागले. या षटकांत झाय रिचर्डसनही शुन्यावर बाद झाला.
केएल राहुल आणि दिपक हुडाचे अर्धशतक
पंजाबकडून केएल राहुल आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. या दोघांनी सुरुवातही चांगली केली. मात्र, तिसऱ्या षटकांत मयंक १४ धावा करुन चेतन सकारिया या नवख्या गोलंदाजाच्या चेंडूवर बाद झाला. पण त्याच्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि ख्रिस गेलने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली.
गेलने त्याच्या नेहमीच्या अंदाजात फलंदाजी करत २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारासंह ४० धावांची वादळी खेळी केली. त्याने राहुलसह ६७ धावांची भागीदारी केली. त्यांची भागीदारी रंगत असतानाच अखेर युवा रियान परागने आक्रमक गेलचा अडथळा दूर केला. पण तरीही राजस्थानला पंबाजची धावगती रोखण्यात अपयश आले. पुढे केएल राहुलने ३० चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या दिपक हुडाने १३ आणि १४ व्या षटकांत मिळून ५ षटकारांचा पाऊस पाडला. त्याने १६ व्या षटकांत २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे १६ षटकांतच पंजाबने १७० धावांचा आकडा सहज पार केला.
पंजाबने १६ षटकांत २ बाद १७२ धावा केल्या.
पंजाबने जिंकली नाणेफेक
या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा राजस्थान संजू सॅमसन या नव्या कर्णधारासह या हंगामात खेळताना दिसणार आहे. तर पंजाबने या हंगामापासून आपले नाव बदलले आहे. पूर्वी किंग्स इलेव्हन पंजाब या नावाने खेळणारा संघ आता पंजाब किंग्स या नव्या नावाने ओळखला जाईल. त्यामुळे आता या नव्या बदलांसह हे दोन्ही संघ आयपीएलच्या नव्या हंगामासाठीही सज्ज झाले आहेत.