जूनच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय संघ आयरलँडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आयरलँडविरुद्ध 2 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
या मालिकेसाठी आयरलँड संघाच्या निवड समितीने त्यांचा 14 खेळाडूंचा संघ जहीर केला आहे. या संघात त्यांनी 25 वर्षीय अँडी मॅक्ब्रीन आणि 18 वर्षीय जोशुआ लिटिल यांना संधी दिली आहे.
या दोघांनीही त्यांच्या कामगिरीने निवडसमितीचे लक्ष वेधून घेतले होते. लिटिलने 2016 मध्ये आयरलँड संघातून हाँगकाँग विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. यामुळे तो आयरलँडकडून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.
तसेच मॅक्ब्रीनने नोर्थ वेस्ट वॉरियर्स संघाकडून खेळताना मागील 4 सामन्यात 6 विकेट्स घेऊन प्रभावित केले होते. भारताविरुद्धच्या या टी 20 मालिकेत आयरलँडचा संघ गॅरी विल्सनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
आयरलँड संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अँड्र्यू व्हाइट म्हणाले, ‘नुकत्याच पार पडलेल्या नेदरलँडमधील तिरंगी मालिकेत अनेक खेळाडूंची चांगली कामगिरी पहायला मिळाली. या कामगिरीबरोबरच या आठवड्याच्या शेवटी ससेक्स येथे होणाऱ्या सामन्यानंतर आम्ही भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी आंतिम 11 जणांच्या संघात कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेऊ.’
आयरलँड विरुद्ध भारत संघात अनुक्रमे 27 जून आणि 29 जूनला दोन टी20 सामने होणार आहेत. हे दोन्ही सामने डब्लिन येथे होणार आहेत.
या मालिकेनंतर भारतीय संघ तेथूनच थेट इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
असा आहे आयरलँडचा संघ:
गॅरी विल्सन (कर्णधार), अँड्र्यू बलबीर्नी, पीटर चेस, जॉर्ज डॉकरेल, जोश लिटिल, अँड्र्यू मॅक्ब्रीन, केविन ओब्रायन, विल्यम पोर्टरफील्ड, स्टुअर्ट पॉईनटर, बॉयड रॅनकिन, जेम्स शॅनन, सिमी सिंग, पॉल स्टर्लिंग, स्टुअर्ट थॉम्पसन.
महत्त्वाच्या बातम्या:
–धोनी-कोहलीवर या युवा क्रिकेटपटूची स्तुतीसुमने
–एकदिवसीय विश्वचषकात हे तीन संघ करू शकतात 500 धावा
–कोण आहे टीम इंडियाचा भारी फुटबॉलपटू? धोनी, विराट की रोहित?