2017 पासून आयर्लंड संघासाठी खेळत असलेला भारतीय वंशाचा स्टार क्रिकेटपटू सिमी सिंग यकृताच्या गंभीर समस्येनं त्रस्त आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सिमीच्या वैद्यकीय स्थितीला ‘ॲक्युट लिव्हर फेलियर’ असं म्हणतात. यावर ‘लिव्हर ट्रान्सप्लांट’ हा एकमेव उपचार आहे. सिमी सिंग सध्या उपचारासाठी भारतात आला आहे. तो हरियाणाच्या गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार घेतोय.
रिपोर्ट्सनुसार, सिमी सिंगला काही महिन्यांपूर्वी आयर्लंडमध्ये ताप आला होता. त्यानंतर त्याची प्रकृती खालावत गेली. डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्याच्या अनेक चाचण्याही करण्यात आल्या. पण त्याच्या आजारपणाचं कोणतंही ठोस कारण समोर आलं नाही. यानंतर अधिक वेळ न घालवता तो चांगल्या उपचारासाठी भारतात आला.
आयर्लंडहून आल्यानंतर सिमी सिंग याच्यावर प्रथम चंदीगड येथील पीजीआयमध्ये उपचार करण्यात आला. परंतु चुकीची औषधं आणि रोगाचं अचूक निदान न झाल्यानं त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. नुसत्या तापानं सुरू झालेला त्याचा त्रास ‘लिव्हर फेलियर’पर्यंत पोहोचला. याच दरम्यान त्याला काविळच्या समस्येनंही ग्रासलं. उपचारादरम्यान त्याचं लिव्हर निकामी झाल्याची पुष्टी झाली. त्यानंतर लवकरच लिव्हर ट्रान्सप्लांट अपेक्षित आहे.
मोहालीत जन्मलेला सिमी सिंग आयर्लंडला जाण्यापूर्वी पंजाबच्या अंडर 14 आणि अंडर 17 संघाचा सदस्य होता. त्याचं टीम इंडियासाठी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न होतं. मात्र येथे फारसं यश न मिळाल्यानं तो आयर्लंडला गेला. तेथे त्यानं क्लब क्रिकेट ते आयर्लंडच्या राष्ट्रीय संघापर्यंतचा प्रवास केला.
एक गोलंदाजी अष्टपैलू म्हणून, सिमी सिंगनं आयर्लंड क्रिकेट संघासाठी एकूण 88 आंतरराष्ट्रीय सामने (35 एकदिवसीय आणि 53 टी20) खेळले. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 39 विकेट घेतल्या आहेत. तर टी20 मध्ये त्याच्या नावे 44 विकेट्स आहेत. याशिवाय सिमी सिंगकडे 13 प्रथम श्रेणी आणि 79 लिस्ट ए सामन्यांचा अनुभवही आहे.
हेही वाचा –
असं करणं अशक्यच! शुभमन गिलनं मागे धावत जाऊन घेतला अविश्वसनीय झेल, VIDEO एकदा पाहाच
जोस बटलर दुखापतीमुळे बाहेर, इंग्लंडला मिळाला नवा टी20 कर्णधार
स्टार भारतीय क्रिकेटपटूची राजकारणात एंट्री, या पक्षाची सदस्यता स्वीकारली