भारतीय क्रिकेट संघात सध्या अनेक बदल घडताना दिसत आहेत. हे होणारे बदल योग्य प्रकारे करण्याची जबाबदारी राहुल द्रविड यांच्यावर आहे. द्रविड यांना नुकतीच काही दिवसांपूर्वी भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाली आहे. टी२० विश्वचषकानंतर रवी शास्त्रींचा संघासोबतचा करार संपला आणि त्यांच्या जागी द्रविड यांची नियुक्ती केली गेली. संघ व्यवस्थापनामध्ये झालेल्या बदलांविषयी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने त्याचे मत मांडले आहे.
त्याच्या मते संघ व्यवस्थापनात झालेल्या या बदलांमुळे कोणालाच काही समस्या नाही होणार. त्याने ही गोष्ट पटवून देताना विराट कोहलीचे देखील नाव घेतले, ज्याने टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व सोडले होते. इरफानने ही प्रतिक्रिया भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी दिली आहे.
इरफान यापूर्वी द्रविड यांच्या नेतृत्वातील भारतीय संघात खेळला आहे. इरफानने या कार्यक्रमात द्रविड यांच्या काम करण्याच्या पद्धतीचा खुलासा केला आहे. त्याच्या मते द्रविड गोष्टींना जास्त बदलत नाहीत. तसेच त्याने अशी अपेक्षाही व्यक्त केली की, विराट कोहली आणि द्रविड यांची चांगली जोडी जमेल.
तो म्हणाला की, “ही राहुल द्रविड आणि कर्णधार विराट कोहलीमध्ये एक नवीन भागीदारी असेल. कसोटी क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात मला कोणतीच समस्या दिसत नाहीय. कारण द्रविड एक असा व्यक्ती आहे, जो सिस्टमच्या हिशोबाने चालतो, तो सिस्टमला जास्त बदलत नाही. एक गोष्ट ही आहे की, या भागीदारीत चांगला समजूतदारपणा आहे आणि याची चर्चा होईल. तसेच युवा खेळाडूंनाही तेवढेच महत्व दिले जाईल, जेवढे एका वरिष्ठ खेळाडूला संघात मिळते.”
रवी शास्त्रींनंतर द्रविड यांनी भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. जबाबदारी स्वीकारल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी त्यांच्या संघासोबतच्या अभियानाला सुरुवात केली. त्यांची सुरुवात अतिशय उत्कृष्ट राहिली आहे. न्यूझीलंडविरुद्ध पार पडलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताने ३-० असा विजय मिळवला. अशात उभय संघातील २५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतही द्रविड यांच्या मार्गदर्शनातील संघाकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.