भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतू टी-20 क्रिकेटमध्ये त्याचा प्रभाव अजूनही कायम आहे. सध्या लंका प्रीमियर लीग मध्ये इरफान पठाण कॅंडी टस्कर्स संघाकडून खेळत आहे. इरफान पठाणने जाफना स्टैलिन्स संघाविरुद्ध खेळताना 19 चेंडूत 25 धावांची खेळी केली. यामधे चार चौकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 2,000 धावांचा टप्पा पार केला.
आपल्या नावे केला अनोखा विक्रम
या खेळीसह इरफान पठाणने टी-20 सामन्यांत 2,000 धावा आणि 150 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. असे करणारा भारताचा तो केवळ दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या पूर्वी हा कारनामा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने देखील केला आहे. रविंद्र जडेजाने ही कामगिरी टी-20 क्रिकेटमध्ये 227 सामन्यात केला आहे. इरफान पठाणने ही कामगिरी 180 टी-20 सामन्यातच केली आहे. त्यामुळे इरफान पठाण हा टी-20 मध्ये 150 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा आणि 2,000 धावा पूर्ण करणारा सर्वात वेगवान खेळाडू ठरला.
रविंद्र जडेजाने टी-20 मध्ये आतापर्यंत 252 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2586 धावा केल्या आहेत आणि 164 विकेट्स घेतल्या. दुसर्या बाजूला इरफान पठाणने 180 टी-20 सामने खेळताना 2009 धावा आणि 173 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
यावर्षीच जाहीर केली निवृत्ती
इरफान पठाणाने ४ जानेवारी २०२० ला क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. डावखुरा वेगवान गोलंदाज असणारा इरफान आपल्या स्विंग गोलंदाजीसाठी प्रसिध्द होता. तसेच संघासाठी उपयुक्त फलंदाजी देखील करत असे. भारतीय संघाचे त्याने २९ कसोटी, १२० वनडे आणि २४ टी-२० सामन्यात प्रतिनिधीत्व केले.
संबंधित बातम्या:
– लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात कोलंबो किंग्ज-कँडी टस्कर्स आमने सामने, इरफानच्या कामगिरीवर लक्ष
– जसप्रीत बुमराहची फलंदाजीतही कमाल; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात झळकाविले तुफानी अर्धशतक
– ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी जिंकायची कसोटी मालिका? भारतीय दिग्गजांनी सांगितला प्लॅन