उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारी याचा वेस्ट इंडिजमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. तो भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याचा मेकअप आर्टिस्ट होता. इरफान सध्या वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषकाचं समालोचन करत आहे. फैयाज इरफानसोबत तेथे गेला होता.
मृत फैयाज अन्सारीचा चुलत भाऊ मोहम्मद अहमद यानं सांगितलं की, इरफान पठाण टी20 विश्वचषकाच्या समालोचनासाठी वेस्ट इंडिजमध्ये गेला आहे. त्यानं त्याच्यासोबत मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारी याला नेलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (22 जून) सायंकाळी हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत असताना फैयाजचा बुडून मृत्यू झाला. फैयाजचा मृतदेह परत आणण्याचा खर्च इरफान पठाण उचलत आहे.
मृत फैयाज अन्सारी हा मूळचा बिजनौरचा रहिवासी होता. तो गेली अनेक वर्ष मुंबईत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होता. तिथे त्याचं सलूनचं दुकान होतं. दरम्यान, एक दिवस भारतीय क्रिकेपटू इरफान पठाण त्याच्या सलूनमध्ये आला. त्यानंतर दोघांची ओळख झाली आणि इरफाननं फैयाजला आपला मेकअप आर्टिस्ट बनवलं. तेव्हापासून इरफान त्याला नेहमी परदेशात सोबत घेऊन जायचा.
मोहम्मद अहमदच्या म्हणण्यानुसार, फैयाज अन्सारी याचं दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे. फैयाजच्या चुलत भावानं सांगितलं की, इरफान पठाण स्वत: वेस्ट इंडिजमध्ये सर्व औपचारिकता पूर्ण करून मृतदेह भारतात आणण्यात मदत करत आहे. फैयाजचा मृतदेह आल्यानंतर कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. या प्रक्रियेला तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकात 2007 पासून चालू आहे हा ट्रेंड, यंदाही झाला खरा!
बाबर आझमची नाचक्की! पाकिस्तानच्या संसदेत झाला ट्रोल, खासदारानं घेतली खूप मजा
“अफगाणिस्तान भारताविरुद्ध जाणूनबुजून हरला”, पाकिस्तानी पत्रकाराचे बिनबुडाचे आरोप; आर अश्विनचं प्रत्युत्तर